कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी सकाळ पासून धुवांधार पाऊस कोसळत असल्याने पुराचे पाणी वाढू लागले आहे. पंचगंगा नदी ३७ फुटाच्या वरुन वाहू लागल्याने कोल्हापूरकरांची धाकधूक वाढली आहे. पावसाचा वाढणारा जोर आणि धरणातून होणारा विसर्गामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून स्थलांतराची तयारी सुरु केली आहे.
रविवार सकाळ पासून जिल्ह्यात संततधार सुरु आहे. गगनबावडा, राधानगरी, चंदगड, शाहूवाडी, भुदरगड, पन्हाळा तालुक्यात अक्षरशा ढगफुटी सारखा पाऊस कोसळत आहे. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस आहे. कोल्हापूर शहरात तर रस्त्यांना तळ्याचे स्वरुप आले होते. एक सारखा पाऊस आणि हवेत कमालीचा गारठा जाणवत होता. राज्य, प्रमुख जिल्हा व ग्रामीण असे ३३ मार्ग पुराच्या पाण्यामुळे बंद झाल्याने जिल्ह्यातील जनजीवन काहीसे विस्कळीत झाले आहे.
राधानगरी धरणाच्या स्वयंचलित दरवाजांना पाणी
धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस चालू असून पाणी साठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. राधानगरी धरणाच्या स्वयंचलित दरवाजांना पाणी लागले असून राधानगरी धरण ८० टक्के भरले आहे. काल दिवसभारत ७३ मिमी पावसाची नोंद झाली. राधानगरी धरणात ८० टक्के इतका पाणी साठा उपलब्ध आहे, म्हणजेच ६६३१. २० द .ल.घ.मी पाणी साठा असून ३३७.८० फूट पाणी पातळी झाली आहे. राधानगरी धरणात जून महिन्यापासून ते २१ जुलै पर्यंत २३३८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आज राधानगरी धरणातील विज निर्मिती केंद्रातून १४०० क्युसेस विसर्ग भोगावती नदी पात्रात चालू आहे. याशिवाय, वारणा ७२ टक्के भरले आहे.
म्हणूनच पुराचे पाण्याला संथ गती‘राधानगरी’, ‘दूधगंगा’, ‘वारणा’ ही धरणे भरलेली नाहीत. ‘राधानगरी’ व ‘वारणा’तून वीज निर्मितीसाठीच विसर्ग सुरु असल्याने पुराचे पाणी संथ गतीने वाढत आहे. त्यामुळेच रविवारी दिवसभरात पंचगंगेची पातळी अवघ्या दोन इंचाने वाढली आहे.
कोल्हापूर शहरातील रस्ते ओसधुवांधार पाऊस त्या रविवारची सुट्टीमुळे कोल्हापूर शहरातील रस्ते अक्षरशा ओस पडल्याचे चित्र पहावयास मिळाले. महत्वाचे काम असेल तेच नागरिक रस्त्यावर दिसत होते.