गौरव सांगावकरराधानगरी : पावसाचा तालुका म्हणून ओळख असणाऱ्या राधानगरी तालुक्यात यंदा मात्र जून महिना कोरडाच गेला. पावसाने दडी मारल्यामुळे धरणातीलपाणीसाठा कमी झाला होता. पण गेल्या चार दिवसात पावसाचा जोर वाढल्याने धरणाच्यापाणीसाठ्यात वाढ झाली आहे.आज, सकाळपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे दिवसभरात ४३ मी.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. राधानगरी धरणात २८.३७ % इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. तर दूधगंगा धरणात २६.०४% व तुळशी जलशयात ३९.५६ %इतका पाणी साठा उपलब्ध आहे. राधानगरीत जून महिन्यापासून ते आज, चार जुलै पर्यंत ४२८ मी. मी. पावसाची नोंद झाली आहे. तर खासगी वीज निर्मिती केंद्रातून एक हजार क्युसेस विसर्ग चालू आहे.पावसाचा जोर वाढल्यामुळे भोगावती नदी पात्रातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. पावसाचा जोर असाच राहिला तर जुलै अखेर धरण भरण्याची शक्यता असल्याचे पाटबंधारे विभागाने सांगितले. दिवसभरात झालेल्या मुळधार पावसामुळे ओढे-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. तर, दुसरीकडे शिवारातील कामाला वेग आला आहे.
राधानगरी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस, पाणीसाठ्यात झाली वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2022 8:00 PM