कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी जोरदार पाऊस कोसळला. दिवसभरात पावसाची रिपरिप राहीलच, मात्र अधून-मधून सुटणारे सोसाट्याचे वारे धडकी भरवत होते. पाऊस आणि थंड वाऱ्यांमुळे दिवसभर अंगातून गारठा जात नव्हता. बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ५८.४३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यामध्ये करवीरसह चार तालुक्यांत अतिवृष्टी झाली.मंगळवारी रात्रीपासूनच पाऊस वाढत गेला, बुधवारी सकाळी जोर वाढत गेला. अधून-मधून जोरदार सरी कोसळत राहिल्या. सकाळी अकरा वाजता जोर काहीसा कमी आला. त्यानंतर ढगांची दाटी काहीशी कमी होऊन आकाश मोकळे झाले. मात्र, दुपारी तीननंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू झाला.
सायंकाळी अधून-मधून जोरदार वाऱ्याबरोबर पावसाच्या सरी कोसळत राहिल्या. मान्सून चक्री वादळाचा तडाखा कोकणाला बसणार असला तरी त्याचा परिणाम म्हणून कोल्हापुरात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवल्याने नागरिकांमध्ये कमालीची भीती आहे.