लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : काेल्हापूर शहरात बुधवारी दुपारी पावसाच्या जाेरदार सरी कोसळल्या. सुमारे अर्धा तास पाऊस झाला. दिवसभर तापमानात मोठी वाढ झाली होती. सकाळपासूनच अंग भाजत होते. आगामी दोन दिवस दिवसांत पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
माॅन्सूनचे आगमन काहीसे लांबणीवर पडले असले तरी कोल्हापूर जिल्ह्यात मात्र पावसाळी वातावरण तयार होऊ लागले आहे. ढगाळ हवामानासह वातावरणात उष्मा अधिक जाणवतो. बुधवारी सकाळी नऊ वाजता घराबाहेर पडल्यानंतर अंग भाजत हाेते. इतका पारा वाढला आहे. जस-जसे सूर्य डोक्यावर येऊ लागला तसा उष्मा वाढत गेला. दुपारी तीनच्या दरम्यान कोल्हापूर शहरात अचानक पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. सुमारे अर्धा तास शहरातील विविध भागांत पाऊस झाला. त्यानंतर मात्र पुन्हा कडकडीत ऊन पडले. आज, गुरुवारपासून दोन दिवस कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
दरम्यान, खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. पेरणीपूर्व मशागत, भात व सोयाबीनच्या धूळवाफ पेरण्यासाठी शिवार फुलली आहेत. मृग नक्षत्र चार दिवसांवर आल्याने पेरण्यांसाठी धांदल उडाली आहे. जिथे शक्य आहे, तिथे भाताच्या पेरण्या करून त्याला पाणी दिले जात आहे.
‘मिरगी’ डोस देण्यास सुरुवात
उसाला जूनच्या पहिल्या आठवड्यात रासायनिक खताचा डोस दिला जातो. यंदा पाऊस अद्याप सुरू झाला नसला तरी मध्यंतरी झालेल्या पावसाने अजून जमिनीत ओलावा आहे. त्या ओलाव्यावरच खत टाकून एक पाणी दिले तर खत चांगल्या प्रकारे लागते. यामुळे खते खरेदीसाठी विकास संस्था, खतविक्री केंद्राबाहेर गर्दी दिसत आहे.