लोकमत न्यूज नेटवर्क
काेल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) मैदान मारण्यासाठी नेतेमंडळींनी आपले वारसदारच रिंगणात उतरवण्याची तयारी केली आहे. नेत्यांची मुले किंवा घरातील व्यक्ती असल्याशिवाय यंत्रणा ताकदीने सक्रिय होत नाही. त्यामुळे तगड्या पॅनेलसाठी दोन्ही बाजूने अशा प्रकारची व्यूहरचना आखली जात आहे.
‘गोकुळ’चे संचालकपद हे आमदारकीच्या तोलामोलाचे पद आहे. या पदामुळे तालुक्यातील सगळी यंत्रणा हातात येत असल्याने अलीकडे नेत्यांनाही ‘गोकुळ’ हवेसे वाटू लागले आहे. विद्यमान संचालक मंडळात दहाजण थेट नेत्यांच्या घरातील अथवा त्यांचे नातेवाईक आहेत. गेल्या वेळेला विरोधी पॅनेलमध्ये माजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड, चंद्रकांत बोंद्रे व ऐनवेळी आलेले अमरिश घाटगे, असे तीनच उमेदवार थेट राजकीय वारसा असलेले होते. सत्तारूढ पॅनेलच्या तुलनेत नवखे उमेदवार असल्याने पॅनेलवर काहीशा मर्यादा आल्या होत्या. हे दूर करत आता ताकदवान उमेदवार रिंगणात उतरवण्याची तयारी केली आहे. त्यातूनच ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र नविद मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक यांचे सुपुत्र ॲड. वीरेंद्र मंडलिक, माजी आमदार चंद्रदीप नरके यांचे बंधू अजित नरके, माजी आमदार के. पी. पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह पाटील, कर्णसिंह गायकवाड, बाळ कुपेकर, विजयसिंह माेरे, रमा सुभाष बोंद्रे आदींनी तयारी केली आहे. त्यामुळे सत्तारूढ गटातही हालचाली गतिमान झाल्या आहेत.
सत्तारूढ गटात बहुतांशी विद्यमान संचालक राहणार आहेत. अरुण नरके यांच्याऐवजी त्यांचे सुपुत्र चेतन रिंगणात आहेत. विरोधकांची रणनीती पाहता, सत्तारूढ गटानेही सावध हालचाली सुरू केल्या असून पॅनेलमध्ये नेत्यांच्या घरातच उमेदवारी घेण्यासाठी आग्रह सुरू आहे. यातूनच आमदार पी. एन. पाटील यांचे सुपुत्र व श्रीपतरावदादा बँकेचे संचालक राजेश पाटील व महादेवराव महाडिक यांचे सुपुत्र माजी आमदार अमल महाडिक यांची नावे पुढे येत आहेत.
नेत्यांच्या घरातील व्यक्ती पॅनेलमध्ये असतील, तर त्यांची संपूर्ण यंत्रणा प्रचारात राहते. त्याचा फायदा संपूर्ण पॅनेलला होत असल्याने तगड्या पॅनेलसाठी थेट वारसदारांनाच रिंगणात उतरण्याची व्यूहरचना आखली जात आहे.
विरोधी गटाकडून उमेदवारीसाठी चाचपणी
विद्यमान संचालक मंडळाकडे यंत्रणा असल्याने त्यांची प्रचार यंत्रणा काहीशी जोरात आहे. विरोधी गटाने विभागनिहाय प्रचार यंत्रणा सक्रिय केली आहे. त्याचबरोबर कोणाला उमेदवारी दिली तर पॅनेलला पूरक ठरेल, याची चाचपणी सुरू केली आहे.
‘गोकुळ’चे तालुकानिहाय ठराव असे-
तालुका ठराव
आजरा २३३
करवीर ६३९ (‘रेणुका’ - कुर्डू व शिवाजीराजे-भुयेवाडी ठराव नाही)
कागल ३८३
गगनबावडा ७६
गडहिंग्लज २७३
चंदगड ३४६ (‘श्रीकृष्ण’- काळकुंद्री ठराव नाही)
पन्हाळा ३५३ (‘महालक्ष्मी’-काळजवडे ठराव नाही)
भुदरगड ३७३ (‘बिसमिल्ला’ सुनावणीत ठराव रद्द)
राधानगरी ४५८
शाहूवाडी २८७
शिरोळ १३४
हातकणंगले ९५ (‘विठठ्ल बिरदेव’- पट्टणकोडोली ठराव नाही)
-----------------------------------------------------
एकूण ३६५०