कोपार्डे : शक्ती आणि बुद्धीचा मिलाफ असणाऱ्या फुटबॉल खेळात आपले कौशल्य दाखविण्याचे मोठे व्यासपीठ स्व. डी. सी. नरके राज्यस्तरीय फुटबॉल चषक स्पर्धेने उपलब्ध करून दिले आहे, असे प्रतिपादन ‘गोकुळ’चे संचालक अरुण नरके यांनी केले.
रविवारी, कुंभी- कासारी साखर कारखान्यावर सांगरुळ फुटबॉल क्लब यांच्या वतीने आयोजित स्व. डी. सी. नरके चषक स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी अरुण नरके बोलत होते. यावेळी माजी आमदार चंद्रदीप नरके, कुंभी बँकेचे अध्यक्ष अजित नरके, कुंभी कारखान्याचे उपाध्यक्ष निवास वातकर, कुंभी बँकेचे उपाध्यक्ष अरुण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
चंद्रदीप नरके म्हणाले, यावर्षी या स्पर्धेत शहरातील संघाचा सहभाग असल्याने स्पर्धेत रंगत वाढणार आहे. यावेळी देवराज नरके, कुंभी कारखान्याचे संचालक संजय पाटील, दादासाहेब लाड, के. डी. पाटील, कुंभी बँकेचे संचालक रंगराव पाटील, तानाजी पाटील, प्राचार्य बी. आर. अकिवाटे उपस्थित होते. रविवारी दिवसभरात झालेल्या सामन्यात पाडळी, निगवे एफ. सी., वडणगे एफ. सी., वडणगे स्पोर्टस्, इस्पुर्ली, बालिंगा, वाशी या संघांनी विजय मिळविले. ही स्पर्धा २० फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.
फोटो: १४ कुंभी फुटबॉल
कुंभी-कासारी कारखान्यावर ९ व्या स्व. डी. सी. नरके राज्यस्तरीय स्पर्धेचे उद्घाटन ‘गोकुळ’चे संचालक अरुण नरके व माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते झाले. यावेळी अजित नरके, निवास वातकर, अरुण पाटील.