कोल्हापूर : कोल्हापूरचा गणेशोत्सव कोणत्याही अडचणीशिवाय पार पडल्यामुळे तसेच विर्सजन मिरवणुकीतील डॉल्बीचे विघ्न टळल्यामुळे बुधवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी अंबाबाई मंदिरातील सिद्धीविनाय गणपतीला साष्टांग नमस्कार घातला. तसेच सपत्नीक अंबाबाईची साडी-चोळीने ओटीही भरली.
यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले, गणेशोत्सवामध्ये कोणतेही संकट ओढवु नये तसेच गणेश विसर्जन मिरवणुक निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी मी देवीकडे प्रार्थना केली होती. मंगळवारी शांततेत व भक्तीमय वातावरणामध्ये गणेशोत्सवाची सांगता झाली.
मुख्य म्हणजे माझ्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील नागरीकांनी, मंडळांनी डॉल्बी हद्दपार केला. त्यानिमित्त आज मी अंबाबाईच्या चरणी नतमस्तक झालो आहे तसेच गणपती बाप्पानेच कृपा दाखवून उत्सव शांततेत पार पाडला आहे. त्यालाही मी साष्टांग घालतो आहे.
नुतन देवस्थान समिती अध्यक्षपद नियुक्तीबाबत पत्रकारांनी पालकमंत्र्यांना छेडले असता त्यांनी महेश जाधव यांच्या घराण्याची व अंबाबाई मंदिराची नाळ पुर्वापार जुळली आहे. बरेच वर्ष अध्यक्षपद रिक्त होते. त्यामुळे विकास रखडला होता.
नुतन अध्यक्षांनी शिर्डी, शेगावप्रमाणे देवस्थानांमध्ये गोळा होणारा पैसा समाजाच्या हितासाठी कसा वापरता येईल याकडे पहावे. पुढील काळात देवस्थान समिती घोटाळे, पुजारी हटाव मोहिमबाबतही देवस्थान प्रामाणीक भुमिका घेईल असे मत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले.