गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्यात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांना हेल्मेट परिधान करणे आवश्यक असून शहराच्या हद्दीत हेल्मेटची सक्ती शिथिल करण्यात आली आहे. परंतु, शहरातून बाहेर जाणाऱ्या व बाहेरून शहरात येणाऱ्या दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान करणे बंधनकारक आहे. अन्यथा, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. गडहिंग्लज पोलिसांकडून आजपासून (शुक्रवार) या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
संकेश्वर-बांदा राष्ट्रीय महामार्ग आणि तालुक्यातील बहुतेक रस्ते चांगले असल्यामुळे अनेक वाहने भरधाव वेगाने धावत आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून अपघातातील मृतांची संख्याही वाढली आहे. रस्ते अपघातात गेल्या तीन महिन्यात तालुक्यात १२ जणांचा बळी गेला आहे. म्हणूनच हेल्मेट सक्तीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
यापूर्वी एप्रिलमध्येच हेल्मेट सक्तीच्या अंमलबजावणीची घोषणा केली होती. मात्र, लोकसभा निवडणूक आणि वाहनधारकांना हेल्मेट खरेदीसाठी पुरेसा अवधी मिळावा यासाठी मुदतवाढ देण्यात आली. निवडणुकीच्या बंदोबस्तातून पोलिस कर्मचारी मोकळे झाल्यामुळे ही मोहीम कडकपणे राबवली जाणार आहे.
याठिकाणी होणार तपासणीसंकेश्वर रोडवरील शेरी ओढा, आजरा रोडवरील गिजवणे ओढा, चंदगड रोडवरील भडगाव पूल, कडगाव रोडवरील नदाफ कॉलनीनजीकचा ओढा, काळभैरी रोडवरील लाखेनगरातील स्वागत कमान. हेल्मेट नसणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यात येणार आहे.
शहरवासीयांकडून स्वागतगडहिंग्लज शहराच्या हद्दीत दुचाकी चालविणाऱ्यांना हेल्मेट सक्तीतून सूट देण्यात आली आहे. मात्र, शहराबाहेर जाणारे आणि बाहेरून शहरात येणाऱ्या सर्व दुचाकीस्वारांना हेल्मेट वापरण्याचे बंधन घालण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील दुचाकी वाहनधारकांतून या निर्णयाचे स्वागत होत आहे.
घरातून बाहेर पडलेला माणूस सुखरूपपणे परत यावा, अशी प्रत्येकाच्या कुटुंबीयांची भावना असते. परंतु, वाढत्या अपघातांमुळे याची शाश्वती राहिलेली नाही. हेल्मेटच्या वापराने काहीजणांचे प्राण नक्कीच वाचणार आहेत. हेल्मेट वापराची सवय लागावी म्हणूनच ही मोहीम हाती घेतली आहे. - हर्षवर्धन बी. जे., परिविक्षाधीन सहाय्यक पोलिस अधीक्षक