कोल्हापूर : दुचाकी अपघातांत हेल्मेट न वापरल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. याला पायबंद घालण्यासाठी राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी गुरुवारी (दि. २१) विधानसभेत पुन्हा एकदा १ आॅगस्टपासून राज्यात ‘हेल्मेट नाही, तर पेट्रोल नाही’ अशी घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर हेल्मेट वापरण्याविषयी कोल्हापुरातील वाहनचालकांच्या शुक्रवारी ‘लोकमत’ने प्रतिक्रिया घेतल्या असता सुरक्षेसाठी हेल्मेट हवे; पण हेल्मेट घेण्यासाठी थोडा अवधी हवा. त्याची तत्काळ सक्ती नको, अशा प्रतिक्रिया उमटल्या. दरवर्षी दुचाकी अपघातांत प्रामुख्याने डोक्याला मार लागून मृत्यू पावणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. विशेष म्हणजे अपघातात मृत्यू पावणाऱ्यांचे वय सर्वसाधारणत: १८ ते २५ या वयोगटातील आहे. सर्वोच्च न्यायालयाने रस्ते सुरक्षा व मोटार वाहन कायद्यानुसार हेल्मेट वापरणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे वेळोवेळी राज्य शासनाने दुचाकीस्वारांना हेल्मेट वापरण्याची सक्ती केली होती. मात्र, काही राजकीय संघटनांनी विरोध केल्याने ही सक्ती बारगळली.कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता, ९ लाख ३४ हजार ६८९ इतकी दुचाकी वाहने आहेत. त्यांत दरवर्षी ५० हजारांहून अधिक वाहनांची भर पडत आहे. वाहने अधिक, त्यामुळे अपघातांचे प्रमाणही दिवसागणिक वाढत आहे. गेल्या दहा महिन्यांत १०० हून अधिक जणांनी जीव गमावले आहेत. त्यामुळे अनेकांनी ‘जीवन अनमोल आहे; त्यामुळे दुचाकी वापरताना हेल्मेट ही आवश्यक बाब असल्या’चे मान्य केले आहे; पण हेल्मेटशिवाय पेट्रोल नाही, या सक्तीला त्यांनी विरोध केला आहे. वाहनचालकांना हेल्मेट खरेदी करता यावीत, याकरिता पोलिस व परिवहन खात्याने आणखी काही दिवसांची मुदत द्यावी, अशी मागणी होत आहे.दहा लाखांहून अधिक हेल्मेटची गरजएकूण ९ लाख ३४ हजार वाहने असली तरी मागे बसलेल्या स्वारालाही हेल्मेट वापरणे सक्तीचे आहे. त्यामुळे प्रतिवाहन गुणिले दोन व्यक्ती असे गणित केले तर १८ लाखांहून अधिक हेल्मेटची गरज लागेल. सध्या सुमारे दोन लाखांहून अधिकजणांकडे हेल्मेट आहेत. तसेच एक लाखाहून अधिक वाहने घरीच पार्किंग केलेली आहेत. त्यामुळे किमान दहा लाख हेल्मेटची गरज भासणार आहे. - समीर बागवान, हेल्मेट डीलर, कोल्हापूर
‘हेल्मेट’ हवे, सक्ती नको
By admin | Published: July 23, 2016 12:32 AM