लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर जिल्ह्यातील २०१९ च्या महापुराचा अनुभव पाठीशी असलेले माजी जिल्हाधिकारी दौलत देसाई हे शुक्रवारी पुन्हा प्रशासनाच्या मदतीला धावून आले. दुपारपासून त्यांनी जिल्हा परिषदेत सुरू असलेल्या मदत आणि पुनर्वसन कार्याच्या नियोजनामध्ये सहभाग घेतला.
दोन वर्षांपूर्वी आलेेला महापूर आणि कोरोना स्थिती यामध्ये दौलत देसाई यांनी ठामपणे सर्व प्रशासनाची यंत्रणा कार्यप्रवण करत या दोन्ही संकटांवर मात करण्याचा प्रयत्न केला होता. एका ठिकाणी ठिय्या मारून बसून रात्री बारा, एकपर्यंत सहकारी अधिकाऱ्यांना सोबत घेेऊन या संकटांचा सामना त्यांनी केला. १३ जुलै २०२१ रोजी त्यांची वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसचिव म्हणून बदली झाली. त्यानंतर राहुल रेखाराव यांनी येथील जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला.
परंतु गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात प्रचंड पाऊस सुरू झाल्याने पुन्हा २०१९ सारखी परिस्थिती निर्माण झाली. पालकमंत्री सतेज पाटील हे गुरुवारी कोल्हापुरात दाखल झाले. रात्रीची एकूण परिस्थिती पाहिल्यानंतर शुक्रवारी पालकमंत्री पाटील यांनी दौलत देसाई यांच्याशी संपर्क साधला, तेव्हा ते मुंबईला हजर झाले नसून ते कोल्हापुरातच असल्याचे त्यांना समजले. यानंतर त्यांनी विनंती केल्यानंतर देसाई शुक्रवारी महापूर व्यवस्थापनाच्या बैठकीत सहभागी झाले. त्यांच्याच नेतृत्वाखाली २०१९ च्या महापुराला जिल्हा सामोरा गेला होता. जिल्ह्यातील बारकावे त्यांना माहिती असल्यानेच पालकमंत्र्यांनी त्यांनाही नियोजनातील सहकार्यासाठी पाचारण केले.