कोल्हापूर : महापूराची जबरदस्त किंमत सर्वांना द्यावी लागली आहे. अशा कठीण काळातही राजर्षी शाहूंच्या या नगरीने सर्वांना एकसंध ठेवण्याचे काम केले आहे. इथूनपुढेही एकमेकांना साथ देऊन या पुरपरिस्थितीवर मात करुया, असे आवाहन माजी केंद्रीय कृषीमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी गुरुवारी येथे केले.
दसरा चौक येथील मुस्लिम बोर्डिंगतर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण सोहळा व पूरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्य वाटपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महापौर माधवी गवंडी, आमदार हसन मुश्रीफ, माजी खासदार धनंजय महाडिक, राष्ट्रवादी कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील, शहराध्यक्ष आर. के.पोवार, महिला शहराध्यक्षा जहीदा मुजावर, उद्योजक व्ही. बी. पाटील, मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, प्रशासक कादर मलबारी, संचालक आदिल फरास आदी प्रमुख उपस्थित होेते.
शरद पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर पवार यांच्या हस्ते सुतारवाडा येथील पूरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. शरद पवार म्हणाले, 'महापुरामुळे आपणा सर्वांनाच जबरदस्त किंमत मोजावी लागली आहे. एकाबाजूला महापूर तर दुस-या बाजूला पाण्याचा प्रश्न निर्माण होऊन टॅँकरद्वारे पाणी पुरविण्याची वेळ आली आहे. अशा कठीण परिस्थितीत सर्वांना एकसंध ठेवण्याची प्रेरणा या राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांच्या नगरीने केला आहे. इथूनपुढे पूरपरिस्थितीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीवरही मात करुया.'
यावेळी वसंतराव मुळीक, बबन रानगे, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, अल्ताफ झांजी, आप्पासाहेब धनवडे, महादेव पाटील, प्रकाश पाटील, निरंजन कदम आदी उपस्थित होते.
पुरग्रस्त महिलांनी बांधल्या शरद पवारांना राख्या सुतारवाडा येथील पूरग्रस्त महिलांनी शरद पवार यांच्यासह आ. मुश्रीफ, माजी खा. महाडिक आदी मान्यवरांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरे केले.