कसबा बावडा : येथील बावडा पॅव्हिलियन ग्राउंडवर सुरू करण्यात आलेल्या कोरोना सेंटरला कसबा बावड्यातील दानशूर व्यक्तींकडून मदतीचा ओघ मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. सेंटरला काय हवं ते फक्त सांगा, आम्ही तुम्हाला लगेच त्या वस्तू पोहोच करतो, अशी विचारणा अनेकांकडून होऊ लागल्याने येथील कोविड सेंटरला कोणत्याच गोष्टींचा तुटवडा भासत नसल्याचे सध्या चित्र आहे. डी. वाय. पाटील ग्रुप, कोल्हापूर महानगरपालिका, जिल्हा प्रशासन व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने व पालकमंत्री सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांच्या सहकार्याने बावडा पॅव्हिलियनमध्ये ४६ ऑक्सिजनचे व १४ नॉन ऑक्सिजनचे, असे एकूण ६० बेडचे कोरोना सेंटर ५ मे पासून सुरू करण्यात आले आहे. या सेंटरमध्ये कसबा बावड्याबरोबरच जिल्ह्यातील रुग्ण दाखल झाले आहेत. सर्व सोयींनीयुक्त व मोफत उपचार होत असलेल्या या सेंटरला आता दानशूर व्यक्तींकडून वस्तू स्वरूपात मदत सुरू झाली आहे. या सेंटरला लागणारी कुणी औषधे दिली, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांची सोय केली, तर कुणी सेंटर स्वच्छ करण्यासाठी लागणारे झाडू, खराटे, सॅनिटायझर व इतर स्वच्छतेचे साहित्य दिले. कुणी येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नाश्त्याची सोय केली आहे, तर कुणी रुग्णांसाठी फळे देत आहेत. विशेष म्हणजे अनेक लोक या सेंटरच्या बाहेर येऊन काय मदत करू अशी विचारणा करू लागले आहेत.
चौकट : डॉ. नेजदार यांची अशीही बांधिलकी
या सेंटरमध्ये महापालिकेचे सहा डॉक्टर आहेत. त्यांना स्थानिक डॉ. संदीप नेजदार व डॉ. तसीलदार मदत करीत आहेत. डॉक्टर नेजदार येथे दिवस-रात्र भेट देऊन रुग्णांवर उपचार करीत त्यांना दिलासा देत आहेत.