दरम्यान, शहराला पुराच्या पाण्याने वेढा दिल्याने निवारा केंद्रात असलेल्या पूरग्रस्त नागरिक आणि जनावारांच्या चाऱ्याची शहरातील विविध सामाजिक संस्था, कार्यकर्ते, राजकीय नेत्यांनी मदतीचा हात दिल्याने शहरवासीयांतून समाधान व्यक्त होत आहे.
शहराला चोहोबाजूंनी कृष्णा व पंचगंगा नदीने वेढा दिल्याने बेटाचे स्वरूप आले आहे. संभाव्य धोका ओळखून नागरिकांनी आपल्या जनावरांसह सुरक्षित स्थळी स्थलांतरित झाल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. सोयाबीन, भुईमूग, भात, भाजीपाला यासारखी पिके, तर पाण्याने गेलीच आहेत. मात्र, पाणी अत्यंत धीम्या गतीने उतरत असल्याने पुराच्या पाण्यात बुडालेल्या ऊस पीक उत्पादनात कमालीची घट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढवले आहे.
शेती पिकाच्या आधी स्वत:चा जीव वाचविणे महत्त्वाचे असल्याने स्थलांतरित झालेल्या पूरग्रस्तांच्या जेवणाची त्याच्या दुभत्या जनावरांची गैरसोय होऊ नये यासाठी शहरातील विविध सामाजिक संघटना, राजकीय नेते, कार्यकर्ते पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात देत आहेत. माळभागावर पूरग्रस्तांसाठी दररोज सुमारे दोन हजार लोकांच्या जेवणाची सोय केली आहे. त्यामुळे पूरग्रस्तांतून समाधान व्यक्त होत आहे.