- इंदुमती गणेशकोल्हापूर : कोरोनाने मृत्यू झालेल्यांंचे राज्यातील १ लाख ३३ हजार ७३० जणांचे वारस ५० हजार रुपयांच्या अनुदानासाठी हेलपाटे मारत आहेत. गेल्या चार महिन्यांत फक्त १३ हजार १५४ लोकांच्या खात्यावर ही रक्कम वर्ग झाली असून, हे प्रमाण फक्त ८.९५ टक्के इतके आहे. राज्य शासनाकडे निधीच नसल्याने गेल्या दोन महिन्यांपासून वारसांच्या खात्यावर रक्कमच वर्ग झालेली नाही.
कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या वारसांना ५० हजार रुपये देण्याची घोषणा केंद्र शासनाने केली होती. त्याची अंमलबजावणी प्रत्येक राज्य सरकारने करावी, असे सांगितले होते. डिसेंबरपासून निधी वितरणाला सुरुवात झाली. राज्यातून आजवर कोरोनाने मृत्यू झालेल्या २ लाख ४५ हजार ५५७ लोकांच्या वारसांचे अर्ज आले आहेत. तेव्हापासून आजतागायत फक्त १३ हजार ५४ वारसांच्या खात्यावर ५० हजार रुपये जमा झाले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून एकाही वारसाच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्यात आलेली नाही. कोरोनामुळे आपल्या जिवाभावाची व्यक्ती गमावून बसलेल्या कुटुंबांना आता निधीसाठीदेखील तिष्ठत राहावे लागत आहे.
कार्यालयात हेलपाटे...
कोरोनामुळे अनेक कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. कर्त्या व्यक्तीचे निधन झाल्याने त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. असे असताना शासनाकडून मिळणारी मदत त्यांच्यासाठी मोलाची असणार आहे. परंतु, हा निधी कधी मिळतो, याची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात रोज नागरिक हेलपाटे मारत आहेत. परंतु, रक्कम थेट राज्य शासनाकडून वर्ग केली जात असल्याने अधिकाऱ्यांनाही काय उत्तर द्यावे, हेच कळत नाही. काही दिवसांत रक्कम मिळेल, असे सांगून दिलासा दिला जात आहे.