विक्रम पाटीलकरंजफेण : पन्हाळा तालुक्यातील दिगवडे येथील शरद शहाजी शिंदे (वय ३८) याच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्याचे निदान होताच त्याच्या घरची मंडळी हदरून गेली होती. मुलाचा जीव वाचविण्यासाठी आई मंगल यांनी किडणी देण्याची तयारी दर्शविली, मात्र किडणी प्रत्यारोपणासाठी सात लाख रुपये खर्च येणार असल्याने भूमिहीन कुटुंब असलेल्या शिंदे कुटुंबाकडे एवढे पैसे कोठून जमा करायचे, असा प्रश्न निर्माण झाला. ‘लोकमत’मधून (गुरुवारी, दि.१) ‘आई मुलास देणार किडणी; खर्चासाठी जीव कासावीस’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध होताच समाजातील दातृत्वाचे हात सरसावले अन् अवघ्या तीन दिवसांत साडेतीन लाखांची मदत जमा झाली. अजूनही मदतीचा ओघ सुरू आहे.शरद याची गावातच केस कर्तनालयाची टपरी आहे. त्यातून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नातून पत्नी, दोन चिमुकली मुले व आई-वडिलांचा सांभाळ करीत होता. मात्र, अचानक आलेल्या संकटाने त्याचे कुटुंब हादरले. आलेल्या संकटावर मात करण्यासाठी सरपंच मारुती पाटील, पोलिस पाटील नंदकुमार पाटील, माजी सरपंच सुनंदा शिंदे, स्वप्निल वजार्डे, संग्राम पाटील, शेखर शिंदे यांनी कुटुंबाला आधार देऊन मदत जमा करण्यास सहकार्य करत आहेत.शरद याचा जीव वाचविण्यासाठी दिगवडे गाव एकवटले असून समाजातील मारुती केरबा पाटील, विजया जाधव, सागर वरपे, अतुल पाटील यांच्यासह समाजातील अनेकांनी आपल्या परीने मदत जमा करून समाजभान जपले आहे. कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात शरद याच्यावर किडणी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
Kolhapur: दिगवडेतील शरदच्या मदतीला सरसावले दातृत्वाचे हात, ‘लोकमत’च्या बातमीमुळे साडेतीन लाखांची मदत जमा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2024 4:25 PM