लोकमत न्यूज नेटवर्क,
कोल्हापूर : एखाद्या व्यक्तीचा अपघात घडल्यानंतर त्याचे नाव, गाव आदी माहिती अथवा त्याच्याजवळच्या व्यक्तींशी संपर्क झाल्यास त्याला मदत करणे अधिक सोपे होते. पण, ही माहिती अनेकदा मिळत नाही. ती अडचण लक्षात घेऊन बोरगाव (ता. पन्हाळा) येथील २४ वर्षीय युवक विनायक गायकवाड याने लॉकडाऊनमध्ये अभ्यास केला. त्यातून सुचलेली क्यूआर कोडच्या मदतीने डिजिटल इर्न्फोमेशन कार्ड (डीआयसी) ही संकल्पना प्रत्यक्षात साकारली आहे. या कार्डद्वारे अपघातग्रस्त व्यक्तीची प्राथमिक माहिती मिळविण्यासह त्याच्या तातडीच्या संपर्कातील (इमर्जन्सी कॉन्टॅक्ट) लोकांशी संपर्क साधता येतो.
याप्रणालीद्वारे अपघातग्रस्त व्यक्तीचे नाव, पत्ता, छायाचित्र, रक्तगट ही महिती आणि त्याचे कुटुंबीय, तातडीच्या संपर्कातील व्यक्तींची नावे, त्यांचे मोबाइल क्रमांक एका स्कॅनवर उपलब्ध होतील. अपघातग्रस्त व्यक्तीच्या वैयक्तिक आणि वाहन विम्याची माहिती मिळवून त्याला तातडीने वैद्यकीय उपचारासाठी दाखल करता येईल. याप्रणालीमध्ये प्रत्येक व्यक्तीला क्यूआर कोड देऊन तो एका विशिष्ट ३७ अक्षराअंकी खात्याशी जोडला जातो. मोबाइल क्रमांक समाविष्ट करून ओटीपी व्हेरिफिकेशन केले जाते. त्यानंतर डीआयसी घेणाऱ्या व्यक्तीची नाव, पत्ता, आदी स्वरूपातील संपूर्ण माहिती भरून डीआयसी तयार केली जाते. डीआयसी कार्डमध्ये वाहनपरवाना, पीयूसी, आरसी बुक आदी कागदपत्रे डिजिटल स्वरूपात ठेवता येतात. ही कोणत्या क्षणी स्मार्टफोनवर उपलब्ध करून घेता येतात. त्यामध्ये बदलही करता येतो.
चौकट
डीआयसी स्कॅन करताच संदेश
ज्यावेळी एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने डीआयसी तपासल्यास त्याचा संदेश डीआयसी कार्डधारक आणि त्याच्या तातडीच्या संपर्कातील व्यक्तींना जातो. अपघात झाल्यानंतर कुणी डीआयसी तपासल्यास त्याचीदेखील माहिती या पद्धतीने शेअर होते.
चौकट
अशी सुचली संकल्पना
अपघातग्रस्तांना जर तातडीने वैद्यकीय मदत मिळाली, तर त्याला मोठी मदत होऊ शकते. त्याचा जीवदेखील वाचू शकतो. मात्र, संबंधित व्यक्तीची आवश्यक माहिती मिळत नसल्याने अडचण येते. ती दूर करण्याच्या विचार, अभ्यासातून डीआयसी कार्डची संकल्पना लॉकडाऊनमध्ये सुचली. मेकॅनिकल पदविका शिक्षणाचा वापर करून संबंधित संकल्पना जानेवारीमध्ये प्रत्यक्षात अस्तित्वात आणली. किचेनच्या स्वरूपात उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या डीआयसी कार्डसाठीचा खर्च अत्यंत कमी आहे. विकसित केलेल्या याप्रणालीच्या पेटंटसाठी अर्ज केला असल्याचे विनायक गायकवाड यांनी सांगितले.
फोटो (०५०३२०२१-कोल-डीआयसी क्यूआर कोड)