कुरुंदवाड : शिवनाकवाडी (ता. शिरोळ) येथील निराधार मुलांच्या मदतीसाठी अनेकांचे हात सरसावले. रोख रकमेसह शैक्षणिक साहित्य, धान्य, आरोग्यसेवा देण्याबरोबर मायेचा कायमस्वरूपी आधारवजा हात अनेकांनी पुढे केला. मदत घेताना निराधार मुलांच्या अश्रूंचा बांध फुटला. त्यामुळे मदत देणारेही काही काळ थबकत होते व डोळ्यांतील अश्रू पुसत मुलांना आधार देत होते. मदत देणारे दातृत्ववान व निराधार मुलांनीही ‘लोकमत’चे आभार मानले.शिवनाकवाडी येथे सोमवारी (दि. १२) पत्नी रूपाली माळी हिचा पती राजेंद्र माळी याने खून केला होता. त्यामुळे कोमल (वय १७), मधुरा (१५), या दोन मुली व शुभम ( १५) हा मुलगा निराधार झाले आहेत. मृत रूपाली याचे आई-वडील हयात नसल्याने, ती यंत्रमागावर कांड्या भरून संसाराचा गाडा चालवित होती. पती राजेंद्र व्यसनी असल्याने गेल्या काही वर्षांपासून घराबाहेबरच असे. त्यामुळे अद्याप अजान असलेल्या या मुलांची जबाबदारी रूपालीवरच होती. माय-लेकरे एकमेकांना आधार देत जगत असल्याने बापाने अचानक येऊन आईचा खून केल्याने मुले निराधार बनली आहेत. त्यामुळे या मुलांना आधार देण्यासाठी ‘लोकमत’ने बुधवार (दि. १४) च्या अंकात ‘शिवनाकवाडीतील मुलांना हवाय मायेचा हात!’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती.या बातमीने समाजातील संवेदनशील मनाला मायेचा पाझर फुटून अनेकांचे हात मदतीसाठी व मायेचा आधार देण्यासाठी या कुटुंबाकडे धावले. त्यामुळे एरवी निर्जन परिसर असलेला हा भाग दातृत्ववानांच्या गर्दीने फुलून गेला आहे. स्वाभिमानी युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष बंडू पाटील (हेरवाड), विश्वास बालिघाटे, डॉ. कुमार पाटील, चंदू बिरोजे, दिलीप कोळी (शिरढोण), चंद्रकांत मस्के, दीपक बंडगर, देवगोंडा आलासे (हेरवाड) यांनी मोठी आर्थिक मदत केली. शिवाय शिक्षणाचा खर्च उचलण्याचीही जबाबदारी घेतली.शिरढोण साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. कुमार पाटील यांनी तिन्ही मुलांची आरोग्य तपासणी व औषधे मोफत दिली. तसेच तिन्ही मुलांच्या बारावी बोर्ड परीक्षेची फी भरण्याचे आश्वासन दिले. शिरोळ पंचायत समितीचे माजी उपसभापती भवानीसिंह घोरपडे सरकार यांनी शैक्षणिक साहित्य देऊन तिन्ही मुलांचे शैक्षणिक खर्च देण्याचे तसेच त्याच्या मूळ गावचे अंबप (ता. हातकणंगले) येथील वडिलार्जित असेल ती मालमत्ता मुलगा शुभम याच्या नावे करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगितले. घोसरवाड (ता. शिरोळ) येथील जानकी वृद्धाश्रमाचे प्रमुख बाबासो पुजारी यांनी नातलगांची तयारी असेल, तर तिन्ही मुलांची जानकी आश्रमात राहण्याची, शिक्षणाची सोय करण्यासाठी नातलगांकडे परवानगी मागितली आहे. कोल्हापूर येथील सामाजिक महिला कार्यकर्तीने नाव न सांगण्याच्या अटीवर निराधार मुलांना पाच हजारांची मदत दिली आहे. अनेकांचे मदतीचे हात पुढे येत रोख रक्कम, शैक्षणिक साहित्य, धान्य याचबरोबर मायेचा आधार देत आहेत. मदत घेताना मात्र या मुलांचे अश्रू अनावर होत आहेत. त्यामुळे पाहणारे व मायेचा आधार देताना परिस्थितीचा नूरच पालटत आहे. त्यामुळे निराधार मुलांची माहिती समाजासमोर मांडल्याने दातृत्ववानातून तर ‘लोकमत’मुळेच पुन्हा मातृत्वाचा आधार मिळाल्याने घेणारे अन् देणारे दोघेही ‘लोकमत’चे आभार मानत आहेत. (वार्ताहर)‘कोमल’च्या मदतीसाठी शिक्षकही धावले‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी अवस्था पोलिसांची असते. अशा दररोजच्या घटनांना त्यांना सामोरे जावे लागत असते. मात्र, शिवनाकवाडीच्या या निराधार मुलांकडे पाहून इचलकरंजी विभागीय पोलिस उपअधीक्षक विनायक नरळे यांचेही मन हेलावून गेले. त्यांनी या तिन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलण्यासाठी आवाहन केले होते. या आवाहनास प्रतिसाद देत कोमल शिकत असलेल्या गंगामाई गर्ल्स हायस्कूल व महाविद्यालयातील शिक्षकांनीही मदतीचा हात पुढे केला आहे. ग्रामस्थांचा पुढाकारमाळी कुटुंबीय मूळचे शिवनाकवाडीचे नसतानाही गावच्या लोकांनी त्यांना मानवतेच्या दृष्टिकोनातून प्रथम मदतीचा हात दिला. घटना घडल्यापासून दवाखाना, अंत्यसंस्कार खर्च ग्रामस्थांनी केला आहे. त्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते सुरेश काळे, सरपंच राजेंद्र खोत, पोलिसपाटील विवेक पाटील, विजय खोत, संजय खोत, लक्ष्मण मिलके, राजू कोरवी, आदींनी पुढाकार घेतला आहे.
शिवनाकवाडीच्या मुलांना मदतीचा हात
By admin | Published: September 15, 2016 12:37 AM