प्रदीप शिंदे -- कोल्हापूर ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’, असे ब्रीदवाक्य घेऊन चोवीस तास धावणाऱ्या एस.टी.च्या गैरसोयींमुळे प्रवासी एस.टी.पासून दूर जात असल्याची ओरड सर्व स्तरांतून होत आहे. मात्र, प्रवाशांचे आणि एस.टी.चे जिव्हाळ्याचे नाते अधिक वृद्धिंगत करण्यासाठी, प्रवाशांना सौजन्यपूर्वक सेवा मिळवून देण्यासाठी कोल्हापूर विभागाच्यावतीने गर्दीच्या हंगामात ‘आर.एस.पी.’ व ‘एन.सी.सी.’च्या विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येणार आहे.स्पर्धात्मक युगात नेटाने पुढे जाण्यासाठी लहान वयातच संस्कार रूजविण्यासाठी, तसेच मुलांतील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांचा विकास करणे क्रमप्राप्त आहे. आतापासूनच त्यांच्यामध्ये समाजसेवेचे धडे रूजविण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाच्यावतीने एक पाऊल पुढे टाकले आहे. सुटीच्या हंगामात प्रवाशांची बसस्थानकांवर गर्दी वाढत असते. अपुरे कर्मचारी असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होते. गैरसोयीमुळे एस.टी. महामंडळाबद्दल प्रवाशांमधून नाराजी वाढते. याचा परिणाम महामंडळाच्या उत्पन्नावर होत आहे. महामंडळाचे उत्पन्न वाढविणे यासह प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाच्यावतीने गर्दीच्या हंगामात आर.एस.पी. व एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. आर.एस.पी. व एन.सी.सी.मधील ज्या विद्यार्थ्यांना सुटीचा सदुपयोग करायचा आहे किंवा समाजसेवेची आवड आहे, ते या उपक्रमात सहभागी होऊ शकतात. सुटीच्या कालावधीत आपल्या वेळेनुसार किमान दोन ते तीन तास या उपक्रमात ते हातभार लावू शकतात. महामंडळाच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. असा आहे उपक्रम....गर्दीच्या काळात बसस्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. बसस्थानकावर आल्यानंतर प्रवाशांना गाडी कधी सुटणार आहे, कधी येणार आहे, कुठे लागली आहे, असे अनेक प्रश्न पडलेले असतात. महामंडळाकडे अपुरे कर्मचारी असल्याने प्रवाशांनाही याची सविस्तर माहिती मिळत नाही. अशा गोंधळलेल्या प्रवाशांना आर.एस.पी. व एन.सी.सी. विद्यार्थ्यांमार्फत गाडीची वेळ, ती कुठे जाणार, कधी येणार याची सविस्तर माहिती पुरविली जाणार आहे. सकाळी आठ ते दुपारी बारा व दुपारी चार ते रात्री आठपर्यंत या विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार आहे. या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना महामंडळाच्यावतीने ठरावीक कालावधी पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या विद्यार्थ्यांना महामंडळाचा कोणताही लाभ मिळणार नाही. गर्दीच्या कालावधीमध्ये बसस्थानकांवरील प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही आर.एस.पी. व एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांची मदत घेणार आहे. सामाजिक बांधीलकी म्हणून त्यांनी केलेल्या मदतीबद्दल त्यांना विशेष प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. तरी ज्यांना या उपक्रमात मदत करायची असेल, त्यांनी कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक येथे संपर्क साधावा. - अभय कदम, स्थानक प्रमुख, मध्यवर्ती बसस्थानक
प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी विद्यार्थ्यांची मदत घेणार
By admin | Published: March 28, 2016 12:48 AM