कोल्हापूर : ‘एफआरपी’ एकरकमी देणे कायद्याने बंधनकारक आहे, ती द्यावीच लागेल. गेल्या चार वर्षांप्रमाणे त्यासाठी कमी पडणाऱ्या रकमेची मदत केली जाईल; पण साखर कारखाने सुरू करावेत अशी सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी साखर कारखानदारांना केली. ठोस मदतीची घोषणा केल्याशिवाय हंगाम सुरू न करण्यावर कारखानदार ठाम राहिले आहेत.बाजारातील साखरेचे दर पाहता शेतकरी संघटनांनी केलेली मागणी सोडा; पण एकरकमी एफआरपी देणेही अवघड आहे. सरकारने मदत केल्याशिवाय हंगाम सुरू न करण्याबरोबरच त्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेण्याचा निर्णय शनिवारी कारखानदारांनी घेतला. त्यानुसार रविवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी मंत्री पाटील यांची भेट घेतली. साखरेचे दर, बॅँकांकडून मिळणारी उचल आणि एफआरपीची होणारी रक्कम यात मोठी तफावत आहे. बँकांकडून मिळणारी रक्कम आणि एफआरपीमधील तफावतीसाठी सरकारने मदत करावी. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक बोलाविण्याची मागणी कारखानदारांनी मंत्री पाटील यांच्याकडे केली. ज्या-ज्यावेळी साखर हंगाम अडचणीत आला, त्या-त्यावेळी सरकारने मदतीचा हात पुढे केला आहे. त्यामुळे एफआरपीसाठी कमी पडणाºया रकमेबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरच बैठक लावली जाईल; पण तोपर्यंत कारखाने सुरू करा, अशी सूचना त्यांनी कारखानदारांना केली; पण कमी पडणाºया रकमेबाबत ठोस घोषणा होत नाही तोपर्यंत हंगाम सुरू न करण्यावर कारखानदार आजच्या बैठकीत ठाम राहिले.बैठकीला हसन मुश्रीफ, ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, चंद्रदीप नरके, गणपतराव पाटील, संजय मंडलिक, अशोक चराटी, माधवराव घाटगे, राजेंद्र पाटील-यड्रावकर, हरीश चौगले, पी. जी. मेढे, आदी उपस्थित होते.पालकमंत्र्यांचा शेट्टींना टोलाएफआरपी देणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यावर पैसे द्यावेच असे कायद्यात नाही; पण ‘७०:३०’ फॉर्म्युल्यानुसार शेतकºयांना पैसे द्यावे लागतात, अशा शब्दांत ‘एफआरपी अधिक दोनशे’ या मागणीवर मंत्री पाटील यांनी राजू शेट्टी यांना टोला हाणला.आवाडे, यड्रावकर, गणपतरावांची बैठकबैठक संपल्यानंतर मंत्री पाटील यांच्यासह बहुतांशी कारखानदार शासकीय विश्रामगृहातून निघून गेले; पण प्रकाश आवाडे, राजेंद्र पाटील-यड्रावकर, गणपतराव पाटील, प्रा. संजय मंडलिक पुन्हा विश्रामगृहातच एकत्र बसले. हंगाम लांबत चालला आहे, उसाची पळवापळवी सुरू झाल्याने ऊसटंचाईचा सामना करावा लागेल, अशी चर्चा यामध्ये झाल्याचे समजते.हंगामाची कोंडी कायमगेल्यावर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात बहुतांशी कारखाने सुरू झाले होते; पण यंदा दरावरून पेच निर्माण झाला असून, पालकमंत्री पाटील यांच्यासमवेतच्या बैठकीनंतरही हंगामाची कोंडी कायम राहिली आहे.
मदत करू, साखर कारखाने सुरू करा; चंद्रकांत पाटील यांची कारखानदारांना सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2018 11:18 PM