कोल्हापूर : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) या विचारधारेच्या जोरावरच निवडणुकीच्या मैदानात उतरलो असून, ३० जूनला पुण्यातून उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे प्रा. दशरथ सगरे यांनी आज, सोमवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. प्रचार दौर्यानिमित्त ते कोल्हापुरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी प्रा. सगरे म्हणाले, गेल्या निवडणुकीत माझा निसटता पराभव झाला. यामुळे खचून न जाता या मतदारसंघातील शिक्षकांच्या प्रश्नांचा पाठपुरावा केला. त्यामुळे शिक्षकांच्या बळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. सातारा येथे यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. प्रत्येक जिल्ह्यात शिक्षकांसाठी स्वतंत्र संदर्भ अभ्यास ग्रंथालय, शिक्षकांच्या मुला-मुलींसाठी जिल्हा वसतिगृहे, विविध विषयांचे शिक्षक भवन, दरवर्षी शिक्षक साहित्य संमेलनाचे आयोजन, शिक्षकांसाठी तालुकास्तर कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरे आयोजित करणे, असा वचननामा घेऊन शिक्षक मतदारांसमोर जात आहे. ‘टीडीएफ’चे अधिकृत उमेदवार कोण? याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, गजेंद्र ऐनापुरे यांनी ‘टीडीएफ’ची नोंदणी केली आहे. जयवंत ठाकरे यांची ‘टीडीएफ’ वेगळी आहे. या आघाडीच्या संस्थापकांपैकी दत्ता भोसले वगळता अन्य कोणी अस्तित्वात नाही. त्यांचे मला पाठबळ आहे. त्यामुळे मी अधिकृत उमेदवार आहे. ‘टीडीएफ’ एक विचारधारा असून, तिच्या जोरावरच मी निवडणूक लढवित आहे. तसेच विवेकानंद शिक्षण संस्थेनेही पाठीशी राहण्याची ग्वाही दिली आहे. या पत्रकार परिषदेस आर. डी. महापुरे, अनिल बोधे, राजेंद्र रानमाळे, एम. एस. मोहिते, एम. डी. चव्हाण, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
‘टीडीएफ’ विचारधारेच्या जोरावरच मैदानात
By admin | Published: May 27, 2014 12:45 AM