कोल्हापूर : सततचा पाऊस आणि सोयाबीनवरील रोगांमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. फवारणी करूनही शंखी गोगलगाईंचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्या, अशी मागणी आमदार हसन मुश्रीफ यांनी नागपूर अधिवेशनात केली. यावर कृषी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, जून ते ऑक्टोबरदरम्यान झालेली, अतिवृष्टी, पूर व सततचा पाऊस यामुळे ६६ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यासाठी ६,०४० कोटींचा निधीही उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. अतिवृष्टी, पूर, सततचा पाऊस आणि शंखी गोगलगाईंच्या प्रादुर्भावामुळे बाधित झालेल्या क्षेत्राकरिता मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे.पिकावरील कीडरोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पांतर्गत कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून प्रशिक्षण देऊन तसेच गावबैठका, एसएमएसद्वारे शेतकऱ्यांना कीड व रोगाबाबत उपाययोजनांची माहिती वेळोवेळी देण्यात आली आहे. त्यामुळे सोयाबीन पिकावरील कीडरोगाचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या आतच ठेवण्यास मदत झालेली आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत अनुदानित तत्त्वावर इमामेक्टिन बेंझोएट, निंबोळी अर्क व प्रोफेनोफास इत्यादीचा पुरवठाही शेतकऱ्यांना करण्यात आल्याचे मंत्री सत्तार यांनी सांगितले.
सोयाबीनचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत द्या, नागपूर अधिवेशनात हसन मुश्रीफांची मागणी; कृषी मंत्री म्हणाले..
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 12:20 PM