कोल्हापूर : महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या श्रृती, अर्पिता, श्रेया, आचल, नेहा या पाच तरुणींनी पाॅकेटमनीमधून सीपीआरमधील कोरोनाग्रस्तांसह नातेवाईकांना नाष्टा तयार करून देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. त्यांच्या या उपक्रमाबद्दलचे वृत्त ‘लोकमत’ मधून गुरुवारी प्रसिद्ध होताच या तरुणींच्या सहाय्याकरीता देश-परदेशातून नाश्ता साहित्यासह आर्थिक मदतीचा ओघ सुरू झाला आहे.
कोरोना लसीबाबत चौकशीसाठी गेलेल्या दुधाळी परिसरातील श्रृती चौगुले व अर्पिता राऊत यांनी तेथील रुग्णांसह नातेवाईकांची जेवण, नाष्ट्याची होणारी आबाळ बघितली. त्यावर यांच्या मदतीसाठी काही तरी करायला हवे म्हणून या दोघींनी राहत्या अपार्टमेंटमधील इतर तिघांनी ही बाब सांगितली. त्यांच्या या उपक्रमाला प्रथम घरच्यांनी विरोध केला. त्यानंतर होकार देताच त्यांनी गेल्या तीन दिवसांपासून सीपीआर परिसरातील कोरोना रुग्णासह नातेवाईकांना सकस नाष्टा देण्यास सुरुवात केली. हा नाष्टा तेथे कमी पडू लागला. त्यामुळे त्यांना आणखी मदतीचे हात हवे होते. या त्यांच्या पाॅझिटिव्ह उपक्रमाबद्दलचे वृत्त गुरुवारी ‘लोकमत’मधून प्रसिद्ध झाले. त्याची दखल घेत कोल्हापुरातील देवीचंद ओसवाल यांच्या ‘स्मार्ट वर्ल्ड ग्रुप’ने दहा हजार रुपयांची, तर कमलेश कुसाळे व मन्सूर यांनी नाष्ट्याचे पन्नास किलो पोहे, कडधान्ये असे साहित्य दिले. याशिवाय अभय देशपांडे यांनी सॅनिटायझर, ग्लोज आदी वस्तू दिल्या आहेत.
परदेशातून मदतीचा ओघ असा
सचिन ऐनापुरे, योगेश रास्ते, मिलिंद म्हैसकर, धैर्यशील पाटील (अमेरिका), योगेश हुद्दार (आर्यलंड) यांनी प्रत्येकी दहा हजार रुपये मदत ऑनलाईन पेमेंटद्वारे या तरुणींच्या खात्यावर जमा केली आहे. या मदतीतून आणखी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना हा सकस नाष्टा दिला जाणार आहे.
कौतुकाचा वर्षाव
या पाचजणींच्या सेवाभावी वृत्तीची दखल घेत कोल्हापूरसह देश-परदेशांतून सोशल मीडियाद्वारे कौतुक केले जात आहे. त्याच माध्यमातून अनेकांनी मदतीचा हात देऊ केला आहे. अनेकांनी या पाचजणींचे कार्य इतर तरुण, तरुणींकरीता प्रेरणादायी असल्याचेही मत मांडले आहे.