कोल्हापूर : अनेक मल्लांना अस्मान दाखविणारे राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते व महाराष्ट्र केसरी आप्पालाल शेख हे गेले काही महिन्यांपासून मधुमेह व मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त आहेत. त्यांच्यावर उपचारासाठी लाखो रुपयांची गरज आहे. अवेळी मानधन अन अर्थिक परिस्थितीमुळे त्यांना आता कुस्तीप्रेमींच्या शुभेच्छा आणि शासनाच्या मदतीची गरज आहे.
मूळचे सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी गावातील आप्पालाल कुस्तीचे धडे गिरविण्यासाठी १९८६ सुमारास शाहूपुरीतील जयभवानी शाहूुपुरी तालमीत दाखल झाले. तेथे नामवंत वस्ताद महमद हनिफ, हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे आणि मुकुंद करजगार यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे गिरविले. अनेक छोट्या मोठ्या कुस्ती करीत त्यांची बल्गेरिया व इराण येथे झालेल्या विश्वचषक कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली. त्यात त्यांना यश आले नाही. त्यानंतर १९९२ मध्ये पुणे येथे झालेल्या कुस्ती अधिवेशनात संजय पाटील (अटकेकर) यांना चितपट करीत त्यांनी महाराष्ट्र केसरीचा किताब पटकाविला. त्यानंतर याचवर्षी न्यूझीलंड येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी निवड झाली. त्यात उत्तरेतील नामांकित मल्ल कर्तारसिंग यांचा भाचा महान भारत केसरी जगदीशसिंग भोला व जयभगवान या मल्लांना दहा मिनिटांत अस्मान दाखविले. न्यूझीलंड येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, इराण, बल्गेरिया आणि अंतिम सामन्यांत न्यूझीलंडच्या कुस्तीपटूवर मात करीत खुल्या गटातील सुवर्णपदक पटकाविले. या स्पर्धेपूर्वी त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यावर मात करीत त्यांनी हे पदक पटकाविले. रणधीरसिंग, सवर्णसिंग, परमिंदरसिंग धुमछडी, जगदीश भोला, जयभगवान यांच्यासह नामांकित मल्लांना अस्मान दाखविले. अनेक वर्षांच्या कुस्तीनंतर खेळ थांबविला. आता मुलगा गौसफाक, अशफाक, अस्लम यांना कुस्तीचे धडे देण्यास सुरुवात केली. मात्र, या दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून ते मधुमेह व मूत्रपिंडाच्या विकाराने ग्रस्त आहेत. अपुरे मानधन व केवळ शेतीवरच निर्भर असणाऱ्या आप्पालाल यांना उपचाराचा खर्च परवडेनासा झाला आहे. त्यामुळे आता कुस्तीप्रेमींची शुभेच्छा व शासनाच्या अर्थिक मदतीची गरज आहे.
कोल्हापूरशी नाळ कायम
आप्पालाल जरी बोरामणी (सोलापूर) येथे राहत असले तरी त्यांची नाळ कोल्हापुरातील शाहूपुरी तालमीशी कायम आहे. वस्ताद महमद हनिफ त्यांनी कुस्तीचे धडे गिरविले. त्या काळात वस्ताद हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे, वस्ताद मुकुंद करजगार यांचे मार्गदर्शनही मोलाचे ठरले. ही जाण ठेवून ते त्यांच्या निधनानंतर सोमवारी खंचनाळे व करजगार कुटुंबियांची भेट घेण्यासाठी सोमवारी चालता येत नसतानाही मुलाबरोबर आले होते. विशेष म्हणजे महापौर केसरीचा पहिली गदा मिळविण्याचा मानही त्यांनी १९९१ साली मिळविला होता.
चौकट
एकाच घरातील तिघेजण ‘महाराष्ट्र केसरी’
आप्पालाल शेख यांचे वडीलबंधू इस्माईल शेख (१९८०), त्यानंतर १९९२ साली स्वत: आप्पालाल आणि २००२ साली पुतण्या मुन्नालाल शेख असे तिघांनी महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकाविला होता. आता त्यांच्या मुलगा गौसफाक, अशफाक आणि अस्लम हेही महाराष्ट्र केसरीची तयारी करीत आहेत.
फोटो : २११२२०२०-कोल-आप्पालाल शेख ०१
फोटो : २११२२०२०-कोल-आप्पालाल शेख ०२
फोटो : २११२२०२०-कोल-आप्पालाल शेख ०३
(आेळी : कोल्हापूर महापौर केसरीची गदा पटकाविल्यानंतरचे छायाचित्र)
फोटो : २११२२०२०-कोल-आप्पालाल शेख ०४
(१९९२ सालचे जुने छायाचित्र)