कोल्हापूर : अकरा महिन्यांपूर्वी पाचगाव (ता. करवीर) येथील ऋतुजा रोहीत पाटील ही दोन गोंडस बाळांना जन्म देऊन कोमामध्ये गेली आहे. तिच्यावर डाॅक्टरांचे शर्थीचे उपचार सुरू आहेत. मात्र, ती अभागी माता काही अजूनही शुद्धीवर आलेली नाही. तिच्यावरील उपचाराच्या खर्चाचा भार पती रोहीत व त्यांचे कुटुंब करीत आहे. आता हा भार क्षमतेच्या पलीकडे गेला आहे. त्यामुळे आता दानशूरांच्या दातृत्वाची या मातेला गरज आहे.
रोहीत व ऋतुजा यांच्या विवाह २०१८ साली झाला. त्यानंतर अकरा महिन्यांपूर्वी ऋतुजा यांनी श्रीशा व साईंश या दोन गोंडस बालकांना एका रुग्णालयात जन्म दिला. जन्म दिल्यानंतर काही वेळातच ऋतुजा या कोमामध्ये गेल्या. आजतागायत त्या कोमातून बाहेर पडलेल्या नाहीत. त्यांच्यावर सातत्याने रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, सध्या त्यांच्यावरील उपचाराचा खर्च पाटील कुटुंबीयांच्या हाताबाहेर गेला आहे. पती रोहीत यांचा गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीत लघु उद्योग आहे. कोरोना संसर्गानंतर सर्वत्र लाॅकडाऊन, निर्बंधामुळे हा व्यवसायही थंडावला आहे. त्यामुळे पत्नीच्या उपचाराचा खर्च कुठून करायचा म्हणून त्यांनी ऋतुजा यांना घरी आणले आहे. दोन्ही मुले आता अकरा महिन्यांची झाली आहेत. मात्र, त्यांची आई अजूनही कोमामधून बाहेर आलेली नाही. आता पुढील उपचारासाठी रोहीत यांना मोठा खर्च आहे. ऋतुजा यांच्याकरीता जिजा सोशळ वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून नेहा देसाई याही मदतीसाठी सर्वत्र प्रयत्न करीत आहेत. त्यांच्यामुळे काहीअंशी मदतही मिळाली आहे. मात्र, ही मदत तोकडी आहे. त्यामुळे दानशूरांनी दातृत्व दाखविले तर ऋतुजा कोमामधून सुखरूप बाहेर पडतील. अशी पाटील कुटुंबीयांना आशा आहे.