कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील काही सामजिक संस्था, संघटनांकडून विविध घटकांसाठी उपक्रम राबवून मदतीचा हात दिला जात आहे. त्यात गरजूंना जेवण दिले जात आहे. कोविड सेंटर उभारणीची तयारी करण्यात आली आहे.
गेल्यावर्षी लॉकडाऊनमध्ये कोल्हापुरातील व्हाईट आर्मी संस्थेने अन्नछत्राच्या माध्यमातून हजारो जणांना जेवण पुरविले. त्यासह डॉक्टर्स, व्यापारी आणि व्यावसायिक, आदी संघटनांच्या मदतीने दसरा चौकातील दिगंबर जैन बोर्डिंगमध्ये कोविड केअर सेंटर सुरू केले होते. यावर्षी व्हाईट आर्मीकडून सध्या गरजूंसाठी अन्नछत्र राबविण्यात येत आहे. आयसोलेशन हॉस्पिटलमधील ७० रुग्णांसाठी रोज चहा, नाष्टा आणि जेवण देण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात रेल्वेने जाणाऱ्या परराज्यातील मजुरांना जेवण पुरविले आहे. दिगंबर जैन बोर्डिंगमध्ये कोविड सेंटर उभारणीची तयारी केली असल्याचे व्हाईट आर्मीचे संस्थापक अशोक रोकडे यांनी सांगितले. उत्तरेश्वर पेठ येथील मातृभूमी चॅॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने गेल्यावर्षी लॉकडाऊनमध्ये गरजूंसाठी पाच रुपयांमध्ये उत्तेश्वर थाळी देण्याचा उपक्रम सुरू केला. वर्षभरापासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सध्या रोज दोनशे थाळींचे वितरण केले जात आहे. त्यातील शंभर थाळी या शहरातील विविध भागांतील गरीब, मजूर, गरजूंना विनामूल्य देण्यात येत असल्याचे या ट्रस्टचे विश्वस्त राजेंद्र चव्हाण यांनी सांगितले. मराठा ऑर्गनायझेशनच्यावतीने सध्या संचारबंदीमध्ये शहरातील रस्त्यांवर बंदोबस्तासाठी असलेले पोलीस आणि कोरोना नियमांचे पालनबाबतची तपासणी करणे महानगरपालिकेचे कर्मचारी यांना ताक वाटप करण्यात येत आहे. पुढील १५ दिवस हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे मराठा ऑर्गनायझेशनचे ऋतुराज माने यांनी सांगितले.