लोकमत न्यूज नेटवर्क,
कोल्हापूर : चहा, नाश्ता, जेवण ते ऑक्सिजन मोफत देत कोल्हापुरातील व्हिजन चॅॅॅरिटेबल ट्रस्टच्या कोविड सेंटरमध्ये कोल्हापूरसह सांगली, मिरज, कराडहून आलेल्या ११३ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. रोज १५ ते २० हजार रुपयांचा खर्च करत वैद्यकीय सेवा पुरविण्याचे काम या ट्रस्टकडून सुरू आहे. रुग्णांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी या सेंटरला सध्या परिचारिका, वॉर्डबॉय आणि पल्सरेट, रक्तदाब तपासणाऱ्या आठ ते दहा मॉनिटरची तातडीने गरज आहे.
या ट्रस्टने कोल्हापुरातील सायबर इन्स्टिट्यूटच्या मुलांच्या वसतिगृहामध्ये गेल्या बारा दिवसांपूर्वी १८० बेडचे कोविड सेंटर सुरू केले आहे. तेथे ऑक्सिजनचे ४० बेड आहेत. या सेंटरमध्ये सध्या नॉन ऑक्सिजनचे ७५, तर ऑक्सिजनवरील ३८ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांना रोज दोनवेळा चहा, नाश्ता, जेवण दिले जाते. गरज असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन देण्यात येत आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली रुग्णांवर औषधोपचार करण्यात येत आहेत. या सेवेबद्दल ट्रस्टकडून एकही रुपया घेतला जात नाही. काही देणगीदारांच्या मदतीवर ट्रस्ट रोजचा खर्च भागवत आहे. मजूर, कामगार, अल्प भूधारक शेतकरी आदी गरीब, सर्वसामान्य कुटुंबांतील रुग्णांना या सेंटरची मोठी मदत होत आहे. या सेंटरला समाजातील दानशूर व्यक्ती, संस्थांनी आपल्यापरीने दिलेल्या मदतीचा हात कोरोनाने गाठलेल्या अनेक गरीब, सर्वसामान्य कुटुंबांतील रुग्णांचा जीव वाचविण्यासह त्यांना दिलासा देणारा ठरणार आहे.
चौकट
शेंडापार्कमधील पाच जणांना आधार
शेंडापार्क येथील कुष्ठधाममधील दिव्यांग, अंध असलेल्या पाच जणांवर या कोविड सेंटरमध्ये उपचार करण्यात येत आहेत. त्यांची तब्येत चांगली आहे. त्यांच्यासाठी स्वतंत्र मजल्यावर व्यवस्था केली आहे.
चौकट
ट्रस्टचे राबणारे हात
या सेंटरसाठी ‘व्हिजन ट्रस्ट’च्या संताजी घोरपडे, डॉ. संगीता निंबाळकर, विशाल जितकर, सुधीर खोत, श्रीधर शेट्टी, आशिष तुकरिया, चेतन शेटे, अमर पाटील आदींचे हात राबत आहेत.
चौकट
गेल्यावर्षी १२०० जणांवर उपचार
गेल्या वर्षी लॉकडाऊन झाल्यानंतर ‘व्हिजन ट्रस्ट’चे अध्यक्ष संताजी घोरपडे यांनी पोलीस प्रशासनाची परवानगी घेऊन स्वत:च्या चारचाकीवर स्पिकर लावून शहरातील विविध भागांत कोरोनाबाबत काळजी घेण्यासाठी प्रबोधन केले. पुढे ‘व्हिजन ट्रस्ट’द्वारे सम्राटनगर आणि गगनबावडा, करवीर तालुक्यातील १५० गावांसह विविध प्रशासकीय कार्यालयांचे सॅॅनिटायझेशन केले. त्यानंतर कोरोनाच्या स्थितीतील गरज लक्षात घेऊन सायबर इन्स्टिट्यूटमध्ये कोविड सेंटर सुरू केले. या सेंटरमध्ये गेल्यावर्षी कोल्हापूर, कर्नाटक, कोकणातील १२०० रुग्णांवर मोफत उपचार केले होते.