जयसिंगपूर : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत होरपळणाऱ्या व कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी जयसिंगपूर येथील दिव्यांग तरुणाने मदतीचा हात दिला आहे. समाजाचे आपण काही देणे लागतो या विचाराने आपल्या स्वमेहनतीच्या पैशांतून दुग्धजन्य पदार्थांचे वाटप करून सामाजिक बांधीलकी जोपासण्याचा प्रयत्न केला.
शाहूनगर येथील २३ वर्षीय दिव्यांग युवक प्रणव पवार याचे दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्रीचे केंद्र आहे. त्याची आजी राजश्री विठ्ठलराव पवार यांचे गतवर्षी ऑगस्ट महिन्यात कोरोनाने निधन झाले होते. सध्या लॉकडाऊनमुळे हा व्यवसाय संथगतीने सुरू असला तरीही आपल्या आजीवरील प्रेमापोटी व त्यांचे स्मरण म्हणून प्रणव व त्याचे मित्र धनंजय साळुंखे, निशांत पवार या युवकांनी उदगांव येथील कुंजवन कोविड सेंटरमधील रुग्णांसाठी ताक, दही अशा दुग्धजन्य पदार्थांचे वितरण केले. या सेंटरमधील अनिल चिलाई, ओंकार शिंदे यांनी रुग्ण व सेंटरच्या वतीने हे पदार्थ स्वीकारले. प्रणव व त्याच्या मित्रांना या समाजसेवेसाठी त्याची आई करूणा पवार यांनी प्रोत्साहन दिले. या उपक्रमामुळे कोविड रुग्णांतून समाधान व्यक्त होत आहे.