कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाकडून सध्या ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येत आहेत. त्यातील तांत्रिक अडचणीबाबत विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या हेल्पलाईन सेवेतील मोबाईल आणि दूरध्वनी क्रमांक दोन दिवसात अद्यावत करणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांनी शुक्रवारी दिली. पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या १७ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी ऑफलाईन पर्याय निवडला आहे. त्यांची परीक्षा घेण्याबाबत उच्च शिक्षण संचालकांच्या निर्देशानुसार विद्यापीठ कार्यवाही करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
परीक्षा मंडळाने विद्यार्थ्यांसाठी विविध २५ मोबाईल, दूरध्वनी क्रमांक असलेली हेल्पलाईन सुरू केली आहे. कराडमधील बी. कॉम. भाग तीन अभ्यासक्रमाची परीक्षा देणाऱ्या काही विद्यार्थ्यांना गुरूवारी त्यांची ऑनलाईन परीक्षा सुरू होण्यापूर्वी लॉगीन करण्याची तांत्रिक अडचण आली. त्यावर त्यांनी या हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यातील काही नंबर लागत नव्हते. काही बंद, तर काही सातत्याने व्यस्त होते. दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधला असता परीक्षा रद्द झाल्याचे उत्तर देण्यात आले. विद्यार्थ्यांना झालेला हा त्रास ‘लोकमत’ने ‘पदवीच्या ऑनलाईन परीक्षेचा गोंधळ’ यावृत्ताद्वारे ऑनलाईन आवृत्तीमध्ये मांडला. त्याची दखल घेत परीक्षा मंडळाच्या संचालक पळसे यांनी या प्रकाराची चौकशी केली. त्यांनी हेल्पलाईन मधील क्रमांक दोन दिवसात अद्यावत केले जातील. चुकीचे उत्तर देणाऱ्या विद्यापीठातील व्यक्तीचा शोध घेतला जात असल्याचे सांगितले. पारंपरिक अभ्यासक्रमांसह पदविका, पदव्युत्तर पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षांच्या परीक्षा संलग्नित महाविद्यालय, अधिविभागांनी दि. १५ मे पर्यंत घ्याव्यात. या परीक्षांच्या सुधारित वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना देण्याची सूचना महाविद्यालय, अधिविभागांनी केली असल्याचे पळसे यांनी सांगितले.
चौकट
२८ हजार विद्यार्थ्यांची परीक्षा
विद्यापीठाने हिवाळी सत्रातील विविध २६ अभ्यासक्रमांच्या परीक्षा शुक्रवारी ऑनलाईन झाल्या. त्यासाठी २९,०७४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २८,५३९ जणांनी परीक्षा दिली, तर ५३५ जण गैरहजर राहिले.
आकडेवारी दृष्टिक्षेपात
ऑनलाईन परीक्षार्थी : ९८,३००
ऑफलाईन परीक्षार्थी : १७,०००