कोल्हापूर : राजकीय पूर्ववैमनस्य व वर्चस्व वादातून रणजित पांडुरंग मोरस्कर (वय ३२, रा. रंकाळा टॉवर) यांच्यावर तलवार हल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी संशयित आरोपी हेमंत कांदेकरसह त्याच्या चौघा साथीदारांना आज, गुरुवारी जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. संशयित आरोपी हेमंत मारुती कांदेकर (३७), संदीप शहाजी कांदेकर (३१), योगेश ऊर्फ गोट्या दत्तात्रय साळोखे (२५, सर्व रा. रंकाळा टॉवर), अमोल दत्तात्रय पाटील (३४, रा. लक्षतीर्थ वसाहत) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी सांगितले, रणजित मोरस्कर १९ आॅक्टोबरला मित्र अनिस मोहनिस नांगनूर, नामदेव लोहार, विजय लोहार यांच्यासोबत रंकाळा रोडवरील एचडीएफसी बँकेच्या एटीएमसमोर बोलत थांबले असता संशयित आरोपी हेमंत कांदेकर, अमोल पाटील, संदीप कांदेकर, योगेश साळोखे, सूरज्या साखरे यांच्यासह १५ जणांनी येऊन मोरस्कर यांना ‘तू आमच्या मित्रांवर दादागिरी करतोस काय. आमच्याशिवाय या भागात दुसरा दादा कोणी नाही. तू आम्हाला वरचढ होतोस काय, असे म्हणून शिवीगाळ करीत अमोल पाटील याने चाकू व हेमंत कांदेकर याने तलवार डोक्यात मारून गंभीर जखमी केले होते. मोरस्कर यांना त्यांच्या मित्रांनी सीपीआरमध्ये दाखल केले होते. त्यांच्या फिर्यादीनुसार जुना राजवाडा पोलिसांनी खुनाचा प्रयत्न (३०७) कलमाखाली गुन्हा दाखल केला होता. त्यापासून आरोपी पसार झाले होते.आज या सर्वांना रंकाळा टॉवर परिसरात अटक केली. त्यांच्यावर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यातही दोन गुन्हे दाखल आहेत. (प्रतिनिधी)
हेमंत कांदेकरसह चौघांना अटक
By admin | Published: October 31, 2014 1:08 AM