स्त्यावर भटकणारा, सतत काहीतरी हळू आवाजात पुटपुटणारा हेमंत आता ‘सावली’त बहरला आहे. ज्याच्याकडे लोक बघायचेही नाहीत, बघितलं तरी असेल कुणीतरी वेडा असं समजून पुढं जायचे तोच हा हेमंत. ज्याला ‘लोकमत’च्या वृत्ताने सावली मिळाली अन् सावलीच्या आधाराने तो आज स्वावलंबी बनला आहे. तुम्ही म्हणाल कोण हा हेमंत? तोच तो हेमंत साळोखे. यंदाच्या पावसाळ्यापूर्वी दसरा चौक ते कसबा बावडा रस्त्यावरील जयंती नाल्याजवळच्या फूटपाथवर नेहमी दिसायचा. जवळजवळ आठ महिने फूटपाथ हेच त्याचे घर होतं. पावसाळा सुरू झाला तरी त्याचं वास्तव्याचं ठिकाण काही बदललं नाही. दिवस असो की रात्र, ऊन असो की पाऊस. तो फूटपाथवरच असायचा. दाढी वाढलेली, अंगावर मळकट फाटके कपडे. भर पावसातही तो फूटपाथ सोडायचा नाही. पाऊस गेल्यानंतर ओल्या कपड्यानिशीच तेथेच तो झोपी जायचा. ‘लोकमत’मधील मुरलीधर कुलकर्णी या संवेदनशील पत्रकाराने त्याची ही अवस्था पाहिली आणि ‘त्या अश्राप जिवाला हवाय निवारा$’ या शीर्षकाखाली त्याची बातमी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाली. ती वाचून लगेच संभाजीनगरातील ‘सावली केअर सेंटर’चे किशोर देशपांडे यांनी रुग्णवाहिका पाठवून हेमंतला ‘सावली’मध्ये नेले. हेमंत सांगत होता त्याप्रमाणे त्याच्या नातेवाइकांचा शोध घेतला; पण जवळचे कोणी मिळाले नाहीत. जे मिळाले त्यांनी जबाबदारी झटकली अन् सावली हेच हेमंतचे घर बनले. तेथील सेवा सुश्रुषा व उपचारांमुळे हेमंत बरा झाला. त्याचा मानसिक रोग पळून गेलाय. सर्वसामान्य माणसाप्रमाणे तो व्यवहार करूलागला. हे पाहून देशपांडे यांनीही त्याला स्वावलंबी बनण्यासाठी प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. एका अर्थाने नोकरीच दिली. कारण महिन्यातील किमान २० दिवस तरी तो तेथील रुग्णांची मनापासून सेवा करीत, प्रसंगी वॉचमनचे कामही करतो. रुग्णांना वर्तमानपत्रे वाचून दाखवितो. ‘लोकमत’ची एक बातमी अन् तिला ‘सावली’ने दिलेल्या प्रतिसादामुळे एक मनोरुण अन् अनाथ बनलेला हेमंत माणसात आला आहे. सावली केअर सेंटर हे निराधार अन् घरात अडसर(?) ठरू लागलेल्या लोकांसाठीचे आश्रयस्थान आहे. सध्या येथे २७ जण आहेत. यातील अनेकजण वृद्ध अन् आजारी आहेत. त्यांचे संगोपन अन् उपचार करून त्यांना मायेची सावली देण्याचा प्रयत्न येथे केला जातो. ‘सावली’त दाखल झालेले; पण आजारी असलेली काही मंडळी बरे झाल्यानंतर सावलीच्या कार्यातही हातभार लावू लागतात, असे देशपांडे सांगतात. आतापर्यंत सावलीने सुमारे ५०० जणांना असा आधार दिला आहे. हे झाले हेमंत अन् सावलीचे. माणूस मनोरुग्ण का बनतो. नैराश्यातून, सततच्या अपयशातून, होणाऱ्या हेटाळणीमुळे किंवा काही वैद्यकीय कारणेदेखील यामागे असू शकतील. आपल्या आसपासही असे मनोरुग्ण अधूनमधून दिसत असतात, अशा लोकांना आधार दिला तर ते बरे होऊ शकतात. यासाठी घरातील मंडळींबरोबरच शेजारी-पाजारी आणि मित्रमंडळींची भूमिका महत्त्वाची ठरते. किमान स्वत:ला काही करता आले नाही तरी असे कार्य करणाऱ्या एखाद्या संस्थेत संबंधित व्यक्तीला दाखल करणे किंवा कळविणे एवढे तरी आपण नक्कीच करू शकतो. ‘सावली’सारख्या अनेक संस्था असे कार्य करीत असतात. वृद्ध आई-वडील किंवा सासू-सासरे, शारीरिकदृष्ट्या असाहाय्य, मतिमंद, मनोरुग्ण अशांना अशा संस्था हाच आधार असतो. तेथेच त्यांच्या आयुष्यातील उत्तरार्ध घालवावयाचा असतो. तो चांगला जावा. यासाठी त्या संस्था त्यांच्यापरीने प्रयत्न करीत असतात. सेवाभावी वृत्तीने असे कार्य करणाऱ्या संस्थांनाही समाजातील दानशूर मंडळी आणि संस्थांनी मदत केली पाहिजे. हातभार लावला पाहिजे. - चंद्रकांत कित्तुरे ‘ङ्म’’ङ्म‘ें३स्र१ं३्र२ं@िॅें्र’.ूङ्मे
‘सावली’तील हेमंत!
By admin | Published: April 13, 2017 8:14 PM