कोल्हापूर : रंगांची उधळण करीत अनेकांनी रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली. मात्र, काही तरुणांनी गांजामिश्रित भांग आणि मद्यप्राशन करून रस्त्यांवर हुल्लडबाजी करीत पोलिसांची कारवाई ओढवून घेतली. रविवारी दिवसभरात पोलिसांनी शहरात ४६२ हुल्लडबाजांवर दंडात्मक कारवाई केली.रंगपंचमीचा उत्साह शहरासह जिल्ह्यात सर्वत्र होता. ठिकठिकाणी नागरिकांनी सहकुटुंब आणि मित्र-मैत्रिणींसोबत रंगपंचमीचा आनंद घेतला. मात्र, काही अतिउत्साही तरुणांच्या टोळक्यांनी रंगपंचमीच्या निमित्ताने गांजामिश्रित भांग पिऊन रस्त्यांवर हुल्लडबाजी केली. बेदरकारपणे वाहने चालवून बंदोबस्तावरील पोलिसांना कारवाई करण्यास भाग पाडले. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी तरुणांनी सार्वजनिक ठिकाणी डॉल्बी लावून हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच त्यांना अटकाव करून प्रतिबंधात्मक कारवाई केली.हुल्लडबाजांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरात सर्वत्र पुरेसा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहर पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्यासह चार पोलिस निरीक्षक, २० सहायक पोलिस निरीक्षक आणि उपनिरीक्षक, १०० पोलिस, ६० वाहतूक पोलिस, १७० होमगार्ड यासह अन्य सुरक्षा यंत्रणाही तैनात केल्या होत्या. सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी हुल्लडबाजांवर कारवाया केल्याचे शहर पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी सांगितले.
एकूण कारवाया
- मद्यप्राशन करून वाहन चालवणे - २४
- अल्पवयीन चालक - १२
- ओपन बार - २
- सार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजी - १३
- मोटार वाहन कायदा - ४११
बंदोबस्त
- पोलिस उपअधीक्षक -१
- पोलिस निरीक्षक - ४
- एपीआय, पीएसआय - २०
- पोलिस अंमलदार - १००
- वाहतूक पोलिस - ६०
- होमगार्ड - १७०
- एसआरपीएफ प्लाटून - १
- स्ट्रायकिंग फोर्स - १
- चार चाकी गस्ती वाहन - ८
- दुचाकी गस्ती वाहन - १४