रमेश वारके --बोरवडे---जीवन जगताना आलेल्या यातना सहन करून आपल्या मुलांना सुखी जीवन देण्याची इच्छा प्रत्येक आई-वडिलांची असते. हाडाची काडे व रक्ताचे पाणी करून आपल्या मुलांसाठी ते झटत असतात. इतके कष्ट करूनही नशिबी दुर्देवच आले, तर दोष कुणाला देणार? कागल तालुक्यातील सावर्डे खुर्द येथील एका अशिक्षित ‘माउली’ची आपल्या तीन गतिमंद मुलांना जगविण्यासाठी आपल्या परिस्थितीशी झुंज गेली ४० वर्षे अहोरात्र सुरू आहे. अरुण, संगीता, किरण अशी मुलांची नावे आहेत. रखमाबार्इंना पहिला मुलगा अरुण झाला. काही वर्षे गेल्यावर त्याला कापरे भरणे, फिट येणे, अंग थरथरणे याबरोबरच बोलतानाही अरुणला त्रास होऊ लागला. त्यानंतर जन्मलेल्या किरणची अवस्थाही अरुणसारखीचे झाली. मोलमजुरी व तुटपुंज्या शेतीत हाडाची काडे करीत पतीच्या मदतीने रखमाबाईने आज ना उद्या सुधारणा होईल, या आशेवर मुलांना जगविले; परंतु मुलांच्या वाढत्या आजाराच्या काळजीने पती पांडुरंगने सात वर्षांपूर्वी जगाचा निरोप घेतला. या माउलीला आज तिन्ही मुलांना सांभाळताना कसरत करावी लागत आहे. मुलगी संगीता घरीच असते; परंतु ही दोन्ही मुले दिवसभर कुठेही भटकत असतात. धडपडत चालताना पडतात. त्यांना शोधून त्यांची सुश्रुशा करावी लागते. कामावार असताना मधल्या सुटीत त्यांना शोधून आणून जेवू घालावे लागते. मुलांसाठीच तिची धडपडआपली मुले व आपण एवढेच तिचे जग आहे. हसू आणि आसू नशीबाला देऊन ही माऊली २४ तास मुलांसाठी झगडत आहे. आपल्या पश्चात आपल्या लेकरांचे काय होईल, याची चिंता रखमाबाईला सध्या पडली आहे.
तीन गतिमंद मुलांना जगविण्यासाठी ‘तिची’ धडपड
By admin | Published: October 14, 2015 11:53 PM