लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील उत्तरेश्वर गवत मंडई येथून शिंगणापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर शुक्रवारी रात्री आढळलेेल्या गव्यांचा कळप शनिवारी पहाटे परत त्यांच्या अधिवासात, कोपार्डे परिसराजवळील जंगलात परतला आहे. पाण्याच्या शोधात शुक्रवारी रात्री पाच गवे शहरात आले असावेत, असा अंदाज वन विभागाने वर्तविला आहे.
शिंगणापूर रस्त्यावर शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास तीन गवे रस्त्यावरून जात असल्याचे पाहून स्थानिक नागरिकांनी ही माहिती वन विभाग, अग्निशमन दल व पोलिसांना कळविली होती.
वन विभागाचे पथक रात्रभर शोधमोहीम राबवीत होते. एका पिलासह पाच गवे शहरात आले होते. शनिवारी पहाटे वन विभागाच्या पथकाला हे पाच गवे सुरक्षितरीत्या पुन्हा जंगल परिसरात परत पाठविण्यात यश मिळाले. जंगल परिसरातील पाण्याचा साठा कमी झाल्याने पन्हाळ्याकडून हे गवे शहरात आले असावेत. शिवाय, ऊस तोडणी सुरू असल्यामुळे उसात राहणाऱ्या गव्यांना त्यांचा आसरा सोडावा लागत आहे, अशी माहिती वन विभागाचे वन अधिकारी सुधीर सोनवणे यांनी दिली.
वन विभागाची दोन पथके कार्यरत
सध्या शहरात कोणत्याही गव्याचा वावर नाही. तरीही वन विभागाच्या दोन पथकांकडून अजूनही शहर परिसरात काही गवे आले आहेत का याचा शोध घेतला जात आहे. यामध्ये वन खात्याचे पशुवैद्यकीय अधिकारी संतोष वाळवेकर यांचाही समावेश आहे. याशिवाय स्वयंसेवी संस्थेकडून मदत घेतली जात आहे. या शोधमोहीमेत व्हाईट आर्मीच्या जवानांनीही सहभागी होण्याची तयारी दर्शविली आहे.
कोट -
गवा हा अतिशय लाजाळू प्राणी आहे. तो केवळ स्वसंरक्षणार्थ हल्ला करू शकतो. कोणीही या प्राण्याच्या जवळ जाऊ नका, अंतर ठेवा. याशिवाय त्याला दगड मारणे, त्याच्यासोबत फोटो काढण्याच्या हेतूने जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका, असे केल्यास तो बिथरण्याची शक्यता आहे. गवे दिसल्यास तत्काळ वन विभागाला कळवावे.
सुधीर सोनावणे,
वन अधिकारी (प्रादेशिक), कोल्हापूर
(संदीप आडनाईक)