लोकमत न्यूज नेटवर्क बोरवडे : दूधगंगा नदीच्या उजव्या कालव्यात सरवडे - उंदरवाडी दरम्यान पाण्याच्या शोधात आलेल्या सात गव्यांचा कळप पडला. उंदरवाडी (ता. कागल) गावच्या हद्दीत शनिवारी ही घटना घडली. सध्या कालव्याला पाणी असल्याने हे सर्व गवे पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जात होते. गव्यांचा अख्खा कळपच कालव्यात पडण्याची घटना सलग दुसऱ्या दिवशी घडली. वाहत जाणाऱ्या गव्याच्या वासराला उंदरवाडी येथील तरुणांनी कालव्यात उतरून बाहेर काढून जीवदान दिले. उंदरवाडी परिसरात गव्यांच्या कळपाचेच दर्शन झाल्याने लोकांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
अधिक माहिती अशी, दूधगंगा नदीच्या उजव्या कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम सुरू आहे. उंदरवाडी गावच्या हद्दीत शनिवारी सकाळी शेताकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांना कालव्याच्या पाण्यात गव्यांचा कळप पडल्याचे दिसले. हे गवे सरवडे येथील बादा नावाच्या शेताजवळील कालव्यात पडून वाहत उंदरवाडी, बोरवडे हद्दीपर्यंत आले होते. ही बातमी परिसरात समजताच गव्यांना पाहण्यासाठी कालव्यावर लोकांनी गर्दी केली होती.
सध्या कालव्याला पाणी सोडल्याने, पाण्याच्या प्रवाहाबरोबर हे सर्व गवे वाहत जात होते. त्यांनी पाण्याबाहेर पडण्याचा प्रयत्न केला, परंतू कालव्याचे अस्तरीकरण केल्याने गव्यांचे पाय निसटत होते.
चौकट
- "गव्यांची आहार पद्धत बदलत चालली असून, चवदार पिकांच्या शोधात ते बाहेर पडत आहेत. गव्यांच्या अधिवासातही बदल होत आहे. त्यामुळे हे गवे मानवी वस्तीच्या दिशेने येत आहेत."
- डी. के. मोरसे, जंगल व गवा प्राणी अभ्यासक