रमेश वारकेबोरवडे/कागल : दुधगंगा नदीच्या उजव्या कालव्यात उंदरवाडी-सरवडे दरम्यान पाण्याच्या शोधात आलेल्या दहा ते बारा गव्यांचा कळप पडल्याची घटना उंदरवाडी (ता.कागल) गावच्या हद्दीत आज सकाळी (गुरुवार दि.२२) घडली. यातील एका गव्याच्या मृत्यू झाला.
सामाजिक कार्यकर्त एन. के.जाधव व अन्य कांहीनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे कालव्यात पडलेले इतर गवे सुरक्षेतपणे बाहेर पडले. रंगराव कुदळे व उंदरवाडीच्या इतर तरुणांनी वाहत आलेल्या मृत गव्याला कालव्याच्या काठाला आणले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. मृत गव्याला पाहण्यासाठी परिसरातील लोकांनी गर्दी केली होती.
दुधगंगा नदीच्या उजव्या कालव्याचे अस्तरीकरण झाले असून उंदरवाडी गावच्या हद्दीत आज सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास दहा ते बारा गव्यांचा कळप कालव्यात पडून तो पाण्याच्या प्रवाहा बरोबर वाहत असलेला एन. के. जाधव यांना दिसला. हे गवे सरवडे येथील शेताजवळील कालव्यात पडल्याचे त्यांनी सांगितले.या गव्यांना वाचविण्यासाठी जाधव यांनी त्यांना हाकलत उंदरवाडी कालव्याच्या लाकडी पुलाजवळ असणाऱ्या कच्च्या भागापर्यंत आणले.तेथून हे गवे बाहेर पडले आणि उंदरवाडीच्या जंगल भागात गेले.
या कळपाबरोबर आलेला एक गवा वाहत्या पाण्यात मृत झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. कालव्याशेजारी असणाऱ्या रंगराव कुदळे, भूषण पाटील, संभाजी पाटील, अनिकेत कुदळे व इतर लोकांनी या मृत गव्याला वाहत्या पाण्यातून बाहेर काढत काठावर आणले. सरपंच भारती पाटील व ग्रामपंचायत सदस्यांनी घटनास्थळी भेट देवून याची कल्पना वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली.
या वर्षीच्या दोन जानेवारीला याच ठिकाणी सात गव्यांचा कळप कालव्यात पडला होता. मोठ्या प्रयत्नामुळे हा कळप सुरक्षितपणे बाहेर पडला होता. पण आज चक्क दहा ते बारा गव्यांचा कळप कालव्यात पडून त्यातील एका गव्याचा दुर्देवाने मृत्यू झाला. ही घटना दुःखदायक असून वनविभाग व पाटबंधारे विभागाने एकमेकाशी चर्चा करुन वन्यप्राण्यांना बाहेर कसे पडता येईल, यावर कायमस्वरुपी उपाय योजना व्हावी. जेणेकरुन गव्यांना आपला जीव वाचवता येईल.
- एस.के.पाटील, विठ्ठल पाटील,उंदरवाडी (ता.कागल).