भारत चव्हाण कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन तसेच कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनामार्फत सुरू करण्यात आलेल्या संस्थात्मक अलगीकरण केंद्रात सर्वांनाच एकत्रपणे ठेवले जात असल्यामुळे येथे निगेटिव्ह असणाऱ्या व्यक्तींना पॉझिटिव्ह होण्याची भीती गडद झाली आहे.
त्यामुळे कोरोना चाचणीचा अहवाल येईपर्यंत दोन दिवस येथे वास्तव्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मुठीत जीव आणि मनात भीती घेऊन जगावे लागते. अलगीकरण केंद्रातील गैरसोयी तर आता नित्याच्याच बनल्यामुळे त्याचा सामना करताना प्रत्येकाच्या जिवाची घालमेल होत आहे.कोल्हापुरात कोरोनाची साखळी तोडण्याच्या हेतूने महानगरपालिका हद्दीत संस्थात्मक अलगीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. त्या ठिकाणी बाहेरून शहरात येणारे प्रवासी किंवा ज्यांचे स्वॅब घेतले आहेत अशांना त्यांचे अहवाल येईपर्यंत अलगीकरण केंद्रात ठेवले जाते. सुरुवातीला ही संख्या दोन अडीचशे होती, परंतु अलीकडे ही संख्या बरीच वाढली आहे. शिवाजी विद्यापीठातील मुला-मुलींची वसतिगृहे, शहरातील खासगी शैक्षणिक संस्थांची वसतिगृहे त्याकरिता आरक्षित करण्यात आली आहेत.संस्थात्मक अलगीकरण केंद्रात नागरिकांची गैेरसोय होऊ नये म्हणून तेथे सार्वजिनक बांधकाम विभाग, महानगरपालिका व सीपीआर अशा सर्वांवर जबाबदाऱ्या वाटून देण्यात आल्या आहेत.
सुरुवातीला या केंद्रातील काम अत्यंत चांगले होते, परंतु मागच्या काही दिवसांपासून तेथील गैरसोयी आणि वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना होणाऱ्या यातना चर्चेत आल्या आहेत. ही अलगीकरणाची केंद्रे आहेत का संसर्ग वाढविणारी केंद्रे आहेत, अशी विचारणा तेथे वास्तव्य करून येणारे नागरिक करत आहेत.केंद्रात स्वच्छतेचा अभावसंस्थात्मक अलगीकरण केंद्रात स्वच्छतेचा अभाव आहे. येथे कॉमन शौचालय व बाथरूम असतात. येथे येणाऱ्या सर्वांना तिच शौचालये व बाथरूम वापरावी लागतात. ती रोज स्वच्छ केली जात नाहीत. घाणीचे साम्राज्य असते. पाण्याचाही अधून-मधून प्रश्न निर्माण होत असतो. केंद्रात वास्तव्याला असणारा कोणी पॉझिटिव्ह असू शकतो. त्याचाही मुक्त वावर शौचालयात व बाथरूममध्ये असतो. त्यामुळे अशा ठिकाणांपासून संसर्गाची शक्यता दाट आहे.खोल्या कधी सॅनिटाईज केल्या जातात?केंद्रात प्रत्येक व्यक्ती ही दोन ते तीन दिवस वास्तव्यास असते. एका खोलीमध्ये दोन व्यक्ती राहतात. परंतु त्या व्यक्ती तेथून निघून गेल्यानंतर दुसऱ्या कोणी व्यक्ती येण्यापूर्वी ती खोली सॅनिटाईज केली पाहिजे; परंतु बऱ्याच वेळा त्या निर्जंतुक केल्या जात नाहीत. जर एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह असेल आणि त्या खोलीत राहून गेली असेल तर नव्याने येणाऱ्या व्यक्तींना संसर्गाची शक्यता मोठी असते.डॉक्टरांकडून उपचार असंभवप्रत्येक केंद्रावर एक वैद्यकीय पथक ठेवण्यात आलेले आहे. वास्तव्यास असलेल्या व्यक्तींचे मन सतत खात असल्यामुळे ताप असल्याचा, खोकला, सर्दी असल्याचा भास होत राहतो. अशावेळी डॉक्टरांकडून वेळीच मार्गदर्शन अथवा औषधोपचार मिळत नाही. वैद्यकीय पथकातील कर्मचारी कुठे तरी दूरवर बसून असतात. तेथेपर्यंत पोहोचणे आणि आपल्याला काय होतंय हे सांगणे म्हणजे एकप्रकारचे दिव्यच असते.सकस आहाराचा अभावअलगीकरण केंद्रात सर्वांना मोफत दोनवेळचे जेवण, चहा, नाष्टा दिला जातो. सर्व काही ठरलेल्या वेळेत मिळते, परंतु आहार सकस मिळतो का हा प्रश्न आहे. कोरोना संसर्गाच्या काळात खरंतर रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी जेवणात अंडी व फळे असावीत, असे सांगितले जाते. परंतु केंद्रात कधी अंडी असतात तर कधी नसतात. गेल्या काही दिवसांपासून फळे मिळाली नसल्याची तक्रार ऐकायला मिळाली. जेवणात भात, चपाती, आमटी, भाजी असते. पण काही वेळेला त्याचा दर्जा म्हणावा तितका चांगला नसतो, असेही सांगण्यात आले.किट मात्र चांगले असतेकेंद्रात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक किट दिले जाते. एका बादलीत ताट, वाटी, तांब्या, चमचा, चादर, बेडशिट, सॅनिटायझयची छोटी बाटली, टुथपेस्ट, ब्रश, पावडरचा डबा, साबण, कंगवा आदी साहित्याचा त्यात समावेश असतो. त्यातल्या त्यात ही सोय चांगली आहे.शहरात २५ संस्थात्मक अलगीकरण केंद्रकोल्हापूर शहर परिसरात २५ ठिकाणी संस्थात्मक अलगीकरण केंद्र सुरू करण्यात आली आहेत. त्यामध्ये एकावेळी १६५१ लोकांची राहण्याची सोय आहे. गुरुवारी या सर्व केंद्रांत ६२८ लोकांना ठेवण्यात आले होते. त्यामुळे १०२३ जागा रिक्त होत्या. शिवाजी विद्यापीठ मुलांचे वसतिगृह क्रमांक १ व ३ तसेच गव्हर्मेंट पॉलिटेक्निक मुलांचे वसतिगृह दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आले आहे.