हेरले : गेल्या सव्वा वर्षात कोरोनामुळे देशातील अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. अनेक युवकांच्या नोकऱ्या गेल्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा संकटात अनेकांनी संधी शोधून स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. हेरले (ता. हातकणंगले) येथील सूरज काटकर या युवकानेही असाच बायोफ्लॉक फिश फार्मिंगचा व्यवसाय सुरू केला असून, पन्हाळा तालुक्यानंतर हातकणंगले तालुक्यात सुरू केलेला हा पहिलाच व्यवसाय ठरत आहे.
पदवीधर असणारा सूरज काटकर हा युवक गेल्या तीन वर्षांपासून गोवा येथे एका औषध कंपनीमध्ये नोकरी करीत होता. नोकरीमध्ये मिळणाऱ्या अल्प पगारापेक्षा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची त्याची इच्छा होती. काही वर्षांपूर्वी गावातील ग्रामपंचायतीच्या तलावातील मासेमारीचा ठेका त्याने घेतला होता. यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून त्याने वेगळ्या पद्धतीचा मत्स्य व्यवसाय सुरू करण्याचे ठरविले. यासाठी त्याने यूट्यूबवरील या संदर्भातील व्यवसायाची माहिती संकलित केली. त्यातून त्याने बायोफ्लॉक फिश फार्मिंगचा प्रोजेक्ट टाकण्याचे ठरविले. पन्हाळा तालुक्यातील जाखले येथील निखिल खैरमोडे यांनी सुरू केलेल्या या व्यवसायाची त्याने भेट देऊन माहिती घेतली.
सूरज याचे वडील राजेंद्र काटकर हे शिरोली एमआयडीसीमध्ये नोकरी करतात. तुटपुंजी शेती असणाऱ्या काटकर यांच्या घरचा खर्च यातूनच भागविला जातो. सूरज याने घेतलेल्या निर्णयाला घरच्यांनीही पाठिंबा देत त्याला आर्थिक मदत केली. येथील गावतलाव परिसरात असणाऱ्या त्याच्या घराच्या रिकाम्या दोन गुंठे जागेत त्याने हा प्रोजेक्ट उभा केला आहे. दहा हजार लिटर क्षमता असणाऱ्या दहा टँकमध्ये फिश फार्मिंगचा व्यवसाय सुरू केला आहे. यासाठी त्याने सुमारे सहा लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. वर्षातून दोनवेळा उत्पन्न घेता येणाऱ्या या व्यवसायात त्याला वर्षाकाठी ७ लाखांचे उत्पादन मिळण्याचा अंदाज आहे. कोणत्याही परिस्थितीत या व्यवसायात यश मिळविण्याची त्याची जिद्द अनेक युवकांना प्रेरणादायी ठरत आहे.
चौकट-
या माशांचे होणार उत्पादन
गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायामध्ये काही ठरावीक जातीच्या माशांचे उत्पन्न घेतले जाऊ शकते. यामध्ये टिलापिया व फंगाशियस या जातीच्या माशांना बाजारात अधिक मागणी असते. त्यामुळे अशा व्यवसायात बाजारातील मागणीच्या अनुषंगाने उत्पादन घेतले जाते. सेहू, कटला, मिरगल, सिंधी, पापदा अशाही जातींना मागणी असते; पण सर्वाधिक मागणी असणाऱ्या प्रजातीचेच उत्पादन या व्यवसायाचा कणा आहे.
चौकट-
ऑक्सिजन हा प्रमुख घटक
या व्यवसायामध्ये टँकमधील ऑक्सिजन नियमित राखणे हा भाग अत्यंत महत्त्वाचा असतो.
वर्षात लाखोंचे उत्पन्न
इलापिया व फंगाशियस या जातीच्या माशांना बाजारात चांगली मागणी आहे. याचा घाऊक बाजारात प्रति किलो १२० रुपये इतका दर मिळतो. किरकोळ बाजारात याचा दर १६० ते १८० रुपये प्रतिकिलो मिळू शकतो. एका टँकमध्ये सुमारे एक हजार सोडण्यात आलेले मासे प्रति महिना सुमारे १५० ग्रॅमप्रमाणे त्याची वाढ होते. यातून एका टँकमधून वर्षात मिळणाऱ्या दोन वेळच्या उत्पन्नामध्ये सुमारे ७० हजार रुपये मिळू शकतात. १० टँकसाठी लागणारे खाद्य, वीज बिल व इतर खर्च हा प्रतिमहिना १५ हजारच्या आसपास येतो.