कुरुंदवाड : हेरवाड (ता. शिरोळ) येथील ग्रामसभेने विधवा प्रथा बंद करण्याच्या क्रांतिकारी निर्णयाचे गावातून प्रत्यक्षात अंमलबजावणीही केली आहे. ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी यांच्या पुढाकाराने गावातील चर्मकार समाजाने या कुप्रथेला मूठमाती देत या निर्णयाच्या अंमलबजावणीत एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या या निर्णयाला बळ मिळाले आहे.
येथील ग्रामपंचायतीने गावसभेत विधवा प्रथा बंद करण्याचा एकमुखी ठराव केला होता. या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत होत असून, राज्यभर या निर्णयाची कौतुक होत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यासह अनेक मंत्र्यांनी या निर्णयाचे स्वागत करत राज्यातील सर्वच ग्रामपंचायतीने असा ठराव करण्याचे आदेश ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले आहेत. हेरवाडच्या या निर्णयाचे अनुकरण माणगाव ग्रामपंचायतीनेही घेतली होती.
हेरवाडकर येथील विष्णू गायकवाड (६०) यांचे निधन झाले. विधवा प्रथा बंद व्हावा यासाठी सरपंच सुरगोंडा पाटील यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी गायकवाड यांच्या घरी जाऊन घरातील पुरुष मंडळी, महिला व चर्मकार समाजातील पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली. प्रथेबाबत गैरसमज दूर करत व प्रबोधन करत महिलेला सन्मान देण्याबाबत जागृती केली. समाजानेही या निर्णयाचे स्वागत करत कुप्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला आणि या क्रांतिकारी निर्णयाचे साक्षीदार ठरले. इतकेच नव्हे तर कावळा शिवणे, मुंडन करणे या गोष्टीलाही तिलांजली देत रक्षाविसर्जन दिनी पसायदान म्हणून या समाजाने क्रांतीची पहिली मशाल पेटविली.
विधवा प्रथा ठराव करणे सोपे होते. मात्र कोणत्याही परिस्थितीत याची अंमलबजावणी करण्याचा ठाम निर्धार केला होता. त्याला चर्मकार समाजाने पुढे येऊन पहिला निर्णय घेतला. त्यामुळे आम्हाला आता बळ मिळाले आहे. - सूरगोंडा पाटील, सरपंच, हेरवाड