"अहो कुठे आहात तुम्ही, अजित बोलतोय...", थेट तालमीतूनच उपमुख्यमंत्र्यांचा क्रीडा अधिकाऱ्यांना फोन!

By समीर देशपांडे | Published: January 29, 2024 11:04 AM2024-01-29T11:04:16+5:302024-01-29T11:04:42+5:30

अजित पवार हे शिस्त आणि वेळेचा काटेकोरपणा, यासाठी ओळखले जातात.

"Hey, where are you, Ajit is talking...", MPs and MLAs arrived late at Ajit Pawar's meeting, Kolhapur | "अहो कुठे आहात तुम्ही, अजित बोलतोय...", थेट तालमीतूनच उपमुख्यमंत्र्यांचा क्रीडा अधिकाऱ्यांना फोन!

"अहो कुठे आहात तुम्ही, अजित बोलतोय...", थेट तालमीतूनच उपमुख्यमंत्र्यांचा क्रीडा अधिकाऱ्यांना फोन!

कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोल्हापूर येथील प्रशासकीय आढावा बैठकीला खासदार आमदार आणि काही अधिकारीच उशिरा आल्याचे चित्र पहावयास मिळाले. दरम्यान गंगावेस तालमीला भेट देण्यासाठी गेलेले अजित पवार यांनी क्रीडा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने तालमीत येण्यासाठी कडक भाषेत सुनावले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील महाराणी ताराराणी सभागृहात बैठक सुरु झाली आहे. दहा वाजता बैठक असताना पाच मिनिटे आधीच अजित पवार आल्यामुळे अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. पोलिसांनी यावेळी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली असून शासकीय ओळखपत्र असल्याशिवाय कोणालाही आत सोडण्यात येत नव्हते. 
        
अजित पवार यांनी बैठक सुरू केल्यानंतर खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आवाडे या बैठकीसाठी हजर झाले. आज या आढावा बैठकीमध्ये प्रामुख्याने अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा, जोतिबा विकास आराखडा यासह पंचगंगा प्रदूषण निर्मूलन आराखड्यावर अधिक  चर्चा होण्याची शक्यता असून कदाचित अजित पवार हे कोल्हापूरसाठी मोठी घोषणा करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तत्पूर्वी पवार यांनी शासकीय विश्रामगृहावर प्रमुख कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. आज पवार यांचा कोल्हापूर जिल्ह्याचा भरगच्च दौरा असून भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्या भीमा कृषी प्रदर्शनाचा समारोप त्यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साही वातावरण असल्याचे दिसून येते.

गंगावेस तालमीचा घेतला आढावा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तालमींना मदत करण्याचे धोरण जाहीर केले आहे. याच पार्श्वभूमीवर तालमीचा आढावा घेण्यासाठी ते आज कोल्हापुरातील गंगावेस तालमीला भेट दिली. यादरम्यान अनुपस्थित असलेल्या क्रीडा अधिकाऱ्यांना फोन करून अजितदादांनी तातडीने त्यांना तालमीत येण्याची सूचना केली. यावेळी अजित पवार म्हणाले, "अहो कुठे आहात तुम्ही अजित बोलतोय, तुम्ही कुठे आहात आता? तालमीत कधी येणार आहे? लवकर शिस्तीत या...." दरम्यान,  अजित पवार हे शिस्त आणि वेळेचा काटेकोरपणा, यासाठी ओळखले जातात. नियम न पाळल्यामुळे अजित पवार यांनी बड्या-बड्या अधिकाऱ्यांना फटकारल्याचे किस्से यापूर्वीदेखील चर्चेत आले आहेत. याची प्रचिती पुन्हा एकदा कोल्हापुरात पाहायला मिळाली. 

Web Title: "Hey, where are you, Ajit is talking...", MPs and MLAs arrived late at Ajit Pawar's meeting, Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.