कोल्हापूर : ‘नुकतच लग्न झालंय महाबळेश्वरला हनीमूनला जायचं आहे, दोघांना ई-पास हवाय’ अशा मागणीचे कारणं देऊन जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी कोल्हापूर पोलिसांच्या सायबर सेलकडे ऑनलाइन ई-पाससाठी परवानगी मागणी करण्यात आली, अशा पद्धतीने हास्यास्पद कारणे टाकून ई-पासची मागणी सायबर सेलकडे होत आहे. पण प्रत्यक्षात फक्त लग्नसमारंभ, रुग्णालय किंवा अंत्यसंस्कार याच कारणासाठी सेलकडून ई-पासला हिरवा कंदील दाखवला जात आहे. लॉकडाऊनच्या चाळीस दिवसांत तब्बल ६७ हजार ५०२ जणांनी जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी ई-पाससाठी सायबर सेलकडे अर्ज केले.
कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रशासनाने पुकारलेल्या लॉकडाऊनमध्ये जिल्ह्याबाहेर प्रवासासाठी ई-पास अनिवार्य केला आहे. कोल्हापूर जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी रोज किमान अडीच हजार ई-पासची मागणी सायबर सेलकडे होत आहे. रक्तातील नातेवाईकाचे निधन, जवळच्या नातलगाचे लग्न, रुग्णाला उपचाराला नेणे हीच सबळ कारणे व त्यासोबतची कागदपत्रे सायबर सेलच्या वेबसाईटवर डाऊनलोड करावीत, त्यांनाच जिल्हाबाहेर जाण्यासाठी परवाना दिला जाईल, असे पोलीस प्रशासनाने यापूर्वीच जाहीर केले. पण या कारणाशिवाय, नवीन लग्न झालं आहे. महाबळेश्वरला हनीमूनला जायचं आहे, पाहुण्यांच्या साखरपुड्याला जायचं आहे, पत्नीला पुण्याला भेटायला जायचं आहे, अशी हास्यास्पद कारणे देऊनही ई-पासची मागणी केली. अशा कारणांसाठी ई-पास नाकारले आहेत. खोटी कारणे देऊन ई-पास मागणा-यांची संख्या मोठी असल्याचे दिसले.
जिल्ह्यात लॉकडाऊन लागलेल्या २३ एप्रिल ते २ जून या कालावधीत जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी ६७ हजार ५०२ जणांनी अर्ज केले आहे. त्यापैकी सबळ कारण असल्याने फक्त ९६४० अर्जदारांना जिल्ह्याबाहेर जाण्यास परवाना मंजूर केला. तर ५७ हजार ८६२ अर्ज नाकारले. कोल्हापूर जिल्ह्यातून मुंबई व पुण्याकडे जाण्यासाठी सर्वात जास्त ई-पासची मागणी होत आहे.
डॉक्टरांकडे विचारपूस
रुग्णाला उपचारासाठी परजिल्ह्यात न्यायचे कारण सांगून परवानगी मागतात. पण कारणांबाबत शंका आल्यास संबंधित हॉस्पिटलकडे फोन करून अपॉइंटमेंट घेतल्याची खात्री करूनच ई-पास निर्गत केला जातो. अनेक अर्जदारांनी एकाच व्यक्तीचे डेथ सर्टिफिकेट जोडून नातेवाईकांच्या अंत्यसंस्कराला जाण्याचे कारण दाखवल्याचेही उघड झाल्याचे सायबर सेलचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी सांगितले.
फक्त महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंतच ईं-पास परवाना
महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पासला मंजुरी देण्याचे पोलिसांना अधिकार आहेत. त्यामुळे कर्नाटक अथवा गोवा राज्यात जाण्यासाठी महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंत ई-पासला मंजूर दिली जाते. त्यामुळे जिल्ह्यातून बेळगाव, निपाणी भागात जाण्यासाठीही ई-पासला मोठी मागणी होती. पण त्यांना फक्त कोगनोळीपर्यंतच प्रवेशाला मंजुरी दिली.
२३ एप्रिल ते २ जूनपर्यंत ई-पास
- मागणी अर्ज : ६७.५०२
- मंजूर अर्ज : ९५४०
- नामंजूर अर्ज : ५७.८६२