कोल्हापूर : काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे भारतीय जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाचही जिल्ह्यांत ‘हाय अलर्ट’ राहण्याचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पोलीस अधीक्षकांना दिले.
त्यानुसार प्रसिद्ध धार्मिक स्थळांभोवती सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी शुक्रवारी रात्री सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली. कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिराची सुरक्षाही वाढविण्यात आली.काश्मीरमधील जवानांवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष पोलीस महानिरीक्षक नांगरे-पाटील यांनी सतर्क राहण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांना दिले.
शुक्रवारी पहाटेपासून कोल्हापूरसह सांगली, सातारा, पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीण या पाचही जिल्ह्यांतील सीमारेषेसह प्रत्येक नाक्यावर व चौकांत पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला. अंबाबाई मंदिरात नेहमीच्या सुरक्षेमध्ये वाढ करून सशस्त्र पोलीस बंदोबस्त सज्ज ठेवण्यात आला आहे.