कोल्हापूर : भारतीय उच्च रक्तदाब नियंत्रण कार्यक्रमाचा प्रारंभ स्वातंत्र्यदिनी महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते महापालिकेच्या विठ्ठल रामजी शिंदे चौकात करण्यात आला.
भारतात सुमारे २० कोटी प्रौढ व्यक्तींना उच्च रक्तदाब आहे. त्यापैकी फक्त एक चतुर्थांश व्यक्तींनाच आपल्याला उच्च रक्तदाब आहे, याची जाणीव असते. केवळ १० टक्के लोकांचा उच्च रक्तदाब नियंत्रित असतो. उच्च रक्तदाब हृदयविकाराला कारणीभूत व सर्वात हानिकारक घटक आहे. त्याचे नियंत्रण करून हृदयविकारामुळे होणारी शारीरिक अक्षमता व मृत्यूचे प्रमाण कमी करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. समीर नवल यांनी यावेळी सांगितले.
हा उपक्रम केंद्र व महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग, इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च, जागतिक आरोग्य संघटना आणि व्हायटल स्ट्रॅटेजी यांचा आहे.
यावेळी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपआयुक्त रविकांत आडसूळ, निखिल मोरे, शिल्पा दरेकर, सहाय्यक आयुक्त विनायक औंधकर, आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पावरा उपस्थित होते.