कोल्हापूर : आरक्षण जाहीर झाल्यामुळे महापालिका निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्यात नव्याने अस्तित्वात आलेली महाविकास आघाडी ही निवडणूक स्वबळावर की एकत्र लढणार यावरून चर्चा रंगली आहे. महाविकास आघाडीतील हायकमांड एकत्र लढण्यासाठी आग्रही, तर स्थानिक नेत्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. लवकरच यावर अंतिम शिक्कामोर्तब होणार असले तरी इच्छुकांमध्ये सध्या मात्र घालमेल सुरू असून निर्णयाकडे नजरा लागून आहेत.
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या प्रमुख तीन पक्षांची महाविकास आघाडी असून राज्यात सत्ता आहे. पदवीधर, शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला यश आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकही एकत्र लढणार असे घोषित केले. यानंतर कोल्हापूर महापालिकेसह ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. महापालिकेच्या गतवर्षीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी स्वबळावर लढत निकालानंतर आघाडी केली हाेती. यंदाची निवडणूक महाविकास आघाडी की स्वबळावर यावरून जोरदार चर्चा सुरू आहे. हायकमांड महाविकास आघाडीसाठी आग्रही असतानाच स्थानिक नेते मात्र स्वबळावर लढणे योग्य ठरणार असल्याचे सांगत आहेत. हायकमांडला यासंदर्भात वस्तुस्थिती सांगितली जाणार असून त्यांच्या अंतिम निर्णयानुसारच अंमलबजावणी केली जाणार असल्याचे तीन पक्षातील नेत्यांचे मत आहे.
चौक़ट
महाविकास आघाडी झाल्यास स्वबळाने लढल्यास
जागा वाटपाचा तिढा, मते विभागणीची शक्यता
बंडखोरीचा धोका, प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी
उमेदवारी देणे डोकेदुखी, ८१ प्रभागांत पक्षाचे चिन्ह पोहोचविता येणार
विरोधी आघाडीला तगडे उमेदवार मिळणार, उमेदवारांची संख्या वाढणार
चौक़ट
इच्छुक द्विधावस्थेत
सध्या प्रत्येक प्रभागात ८ ते १० उमेदवार इच्छुक असल्याचे चित्र आहे. सर्वसाधारण प्रभागात तर याहून अधिक आहेत. महाविकास आघाडी एकत्र लढण्याच्या संदर्भातील निर्णयानंतर इच्छुकांचे भवितव्य ठरणार आहे. महाविकास आघाडी झाल्यास सर्वांनाच येथून उमेदवारी मिळेल याची शाश्वती नाही. त्यामुळे त्यांना अपक्ष अथवा इतर पक्षांची उमेदवारी घ्यावी लागणार आहे. सध्या तरी स्थानिक नेत्यांचा स्वबळाचा सूर आहे. त्यामुळे इच्छुकांची द्विधावस्था झाली आहे.
बातमीदार : विनोद