लाेकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढत असून ‘गोकुळ’ची निवडणूक स्थगितीबाबत संघाशी संलग्न दोन संस्थांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका शुक्रवारी पुन्हा फेटाळण्यात आली. मात्र याबाबत सत्तारूढ गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर अद्याप सुनावणीच झालेली नाही.
‘गोकुळ’च्या संचालक मंडळाची मुदत एप्रिल २०२० राेजी संपली आहे. कोरोनामुळे निवडणूक वर्षभर लांबणीवर गेली. तरीही सत्तारूढ गटाला अजूनही निवडणूक नको आहे. त्यामुळे निवडणुकीला स्थगिती मिळावी, यासाठी उच्च न्यायालयात दोनवेळा याचिका दाखल केली होती. या दोन्ही याचिका न्यायालयात फेटाळून लावल्या. निवडणूक प्रक्रिया सुरू झाली, मात्र त्यानंतर सत्तारूढ गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्याचबरोबर दोन दूध संस्थांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर शुक्रवारी सुनावणी होऊन ती फेटाळण्यात आली. सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर अद्याप सुनावणी झालेली नाही.
न्यायालयीन लढाईत सत्ताधारी अपयशी
‘गोकुळ’ची निवडणूक लांबणीवर टाकण्यासाठी सत्तारूढ गटाने जोरदार प्रयत्न केले. मात्र न्यायालयीन लढाईत ते सध्या तरी अपयशी ठरले आहेत.