कोल्हापूर : कुरुंदवाड (ता. शिरोळ) येथील संस्थानकालीन भालचंद्र टॉकीज व सहा इतर वास्तू ऐतिहासिक वारसा म्हणून घोषित कराव्यात, असे आदेश राज्य शासन व कुरुंदवाड नगरपरिषदेस देण्याची विनंती करणारी याचिका कुरुंदवाड येथील सामाजिक कार्यकर्ते कृष्णा लोकरे व इतर चारजणांसह अॅड. धैर्यशील सुतार यांच्यातर्फे मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. यावर सुनावणी होऊन कुरुंदवाड नगर परिषदेस भालचंद्र थिएटर पाडण्यास न्यायालयाने मनाई केली. कुुरुंदवाड हे संस्थानकालीन शहर असून, त्याचे संस्थान अधिपती पटवर्धन घराणे होते. त्यांच्या कार्यकालात कला, संस्कृती व खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी विष्णू मंदिर, गणपती मंदिर, भालचंद्र टॉकीज, गणपती रेसलिंग थिएटर, सध्याची सीताबाई पटवर्धन माध्यमिक विद्यालयाची इमारत, टेनिस क्लब या वास्तू बांधल्या. या वास्तू सांस्कृतिक वारसा म्हणून जतन करणे आवश्यक आहे. अशा पद्धतीची मार्गदर्शक तत्त्वे केंद्र सरकारच्या हेरिटेज नियमावलीप्रमाणे नगर परिषदेसही बंधनकारक आहेत; पण नगर परिषदेने भालचंद्र टॉकीजची भव्य आणि ऐतिहासिक वास्तू सुस्थितीत असतानाही पाडून त्या जागी शॉपिंग सेंटर बांधण्याचा ठराव मंजूर केला होता. शहरातील नागरिकांनी त्याविरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडेही विरोध नोंदविला होता. मात्र, कारवाई काहीच झाली नाही. त्यामुळे कृष्णा लोकरे व इतर चारजणांसह अॅड. धैर्यशील सुतार यांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. तिची नुकतीच सुनावणी झाली. त्यात भालचंद्र थिएटरची इमारत पाडण्यास मनाई केली.
भालचंद्र टॉकीज पाडण्यास उच्च न्यायालयाची मनाई
By admin | Published: December 13, 2015 1:22 AM