कोल्हापूर : गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या ए.एस. ट्रेडर्स कंपनीच्या १२ संचालकांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी (दि. २५) फेटाळला. या निर्णयामुळे संचालकांच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला असून, पोलिसांकडून संशयितांच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.ए.एस. ट्रेडर्स डेव्हलपर्स आणि या कंपनीशी सलग्न असलेल्या अन्य ११ कंपन्यांमधून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा गुन्हा शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये गुन्हा दाखल होताच २७ पैकी बहुतांश संशयितांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली. जिल्हा व सत्र न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर संशयितांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली. यावर गेल्या चार महिन्यांपासून सुनावणी सुरू होती.न्यायाधीश अमित बोरकर यांनी फिर्यादी रोहित ओतारी यांचे वकील, सरकारी वकील आणि संशयितांच्या वकिलांचे युक्तीवाद ऐकून बारा संशयितांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले. फिर्यादी रोहित ओतारी व एलएलपी कंपनी विरोधी कृती समितीच्या वतीने ॲड. ऋषिकेश अशोक मुंडर्गी, जयंत जे. बारदेस्कर यांनी बाजू मांडली. सरकारच्या वतीने सरकारी वकील विरा वामन शिंदे यांना युक्तीवाद केला.
यांचा जामीन अर्ज फेटाळलालोहितसिंग धर्मासिंग सुभेदार (रा. पलूस, जि. सांगली), दीपक बाबूराव मोहिते (रा. आरे, ता. करवीर), अमित अरुण शिंदे, अभिजित साहेबराव शेळके (रा. शाहूपुरी गवत मंडई, कोल्हापूर), प्रवीण विजय पाटील (रा. गडहिंग्लज), संतोष रमेश मंडलिक (रा. बेळगाव), चांदसो इलियास काझी (रा. माळ्याची शिरोली, ता. करवीर), रवींद्र प्रदीपराव देसाई (रा. नागाळा पार्क, कोल्हापूर), संतोष नंदकुमार कुंभार (रा. पलूस, जि. सांगली), महेश बळवंत शेवाळे (रा. तिटवडे, ता. पन्हाळा), दत्तात्रय विश्वनाथ तोडकर (रा. कोडोली, ता. पन्हाळा) आणि महेश बाजीराव आरेकर पाटील (रा. आरे, ता. करवीर) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला.