गडहिंग्लज : हरळी येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्यावर प्रशासक मंडळाची नियुक्ती झाली होती. आज, शुक्रवारी (दि.४) सकाळी साडेअकराच्या सुमारास प्रशासक मंडळाने कारखान्याच्या व्यवस्थापनाचा पदभार स्विकारला होता. दरम्यान, उच्च न्यायालयाने प्रशासक नियुक्तीला दुपारी स्थगिती दिली. त्यामुळे हे प्रशासक मंडळ औटघटकेचे ठरले.प्रशासक मंडळात कोल्हापूरचे विभागीय सहनिबंधक अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, जिल्हा विशेष लेखापरीक्षक किरणसिंह पाटील यांचा समावेश होता. २१ जानेवारीला कारखान्याचे अध्यक्ष अॅड. श्रीपतराव शिंदे यांच्यावर मनमानी कारभाराचा आरोप करून १२ संचालकांनी अचानक सामुदायिक राजीनामे दिले होते. त्यामुळे साखर विक्रीसह धोरणात्मक निर्णय घेण्यास प्रादेशिक सहसंचालक (साखर) डॉ. एस. एन. जाधव यांनी त्याच दिवशी कारखान्यावर निर्बंध घातले होते.दरम्यान,संचालक मंडळ अल्पमतात आल्याने कारखान्यावर प्राधिकृत अधिकाऱ्याची नेमणूक का करू नये? अशी नोटीसही कारखान्याला बजावण्यात आली होती. त्याची मुदतही कालच संपली होती. गुरुवारी (दि.३) सायंकाळी प्रशासक नियुक्तीचे आदेश देण्यात आले. त्यानुसार शुक्रवारी सकाळी काकडे यांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय मंडळाने पदभार स्विकारला होता. त्यानंतर अवघ्या ३ तासांतच त्याला स्थगिती आली.
गडहिंग्लज कारखाना : प्रशासक मंडळ ठरले औटघटकेचे! उच्च न्यायालयाची स्थगिती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2022 5:30 PM