कोल्हापूर : येथील विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा, कोल्हापूर-मुंबईसाठी सकाळच्या सत्रातील विमानसेवा, आदी विविध मागण्यांबाबत खासदार संजय मंडलिक यांनी भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष अरविंद सिंह यांची त्यांच्या दिल्ली येथील कार्यालयात भेट घेतली. त्यांना निवेदन देऊन चर्चा केली.
यावेळी झालेल्या चर्चेनुसार कोल्हापूर विमानतळाच्या प्रलंबित मागण्या आणि नवीन विमानसेवा सुरू करण्याबाबत लवकरच उच्चस्तरीय समिती कोल्हापूर विमानतळाला लवकरच भेट देत असल्याचे अरविंद सिंह यांनी सांगितले असल्याची माहिती खासदार मंडलिक यांनी दिली.
कोल्हापूर येथे नाईट लँडिंग सुविधा सुरू झाल्यास रोजच्या उड्डाणांची संख्या वाढणार आहे. येथील विमानतळाचे टर्मिनल इमारत, रनवे सबस्टेशनचे काम तातडीने पूर्ण होऊन प्रवाशांकरिता आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधा पुरविणे गरजेचे आहे.
सकाळच्या सत्रातील विमानसेवेमुळे कोल्हापूर येथील व्यापार, उद्योगधंदे व पर्यटनामध्ये वाढ होईल. अहमदाबाद व जयपूर या दोन शहरांसाठी तातडीने नवीन विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी केली आहे.
या दोन शहरांशी विमानसेवा सुरू झाल्यास दीर्घ व्यावसायिक संबंध आणि कोल्हापूर येथे साडेतीन शक्तिपीठांपैकी एक अंबाबाई मंदिर असल्याने या ठिकाणी उत्तर भारतातील भाविक मोठ्या संख्येने येऊन पर्यटन व्यवसाय वाढेल.
त्यामुळे कोल्हापूरहून अहमदाबाद आणि जयपूरसाठी विमानसेवा सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी केली असल्याचे खासदार मंडलिक यांनी सांगितले. यावेळी विमानतळ प्राधिकरणाचे विभागप्रमुख कुमार पाठक, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक विज्ञान मुंडे उपस्थित होते.