कोल्हापूर : दहावीच्या इतिहास विषयाच्या पेपरला बुधवारी (दि. २०) कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांतील २६ परीक्षार्थींना कॉपी करताना भरारी पथकाने पडकले. त्यात कोडोली (ता. पन्हाळा) केंद्रावरील १४ परीक्षार्थींचा समावेश आहे. परीक्षेतील शेवटचा भूगोल विषयाचा पेपर आज, शुक्रवारी होणार आहे.या परीक्षेत बुधवारी सकाळी ११ ते दुपारी दीड या वेळेत इतिहास विषयाचा पेपर झाला. त्या दरम्यान राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या भरारी पथकाने विविध केंद्रांना अचानक भेटी दिल्या. त्यामध्ये कोडोली (ता. पन्हाळा) केंद्रावर १४, हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली केंद्रावर सहा, शिरोली पुलाची येथे दोन आणि रेंदाळ केंद्रावर एक परीक्षार्थी कॉपी करताना सापडला.
गांधीटेकडी पाटण (जि. सातारा) येथील केंद्रावर तीन परीक्षार्थींना कॉपी करताना भरारी पथकाने पकडले. या परीक्षेतील कॉपी प्रकरणाची ही सर्वाधिक संख्या ठरली. संबंधित २६ परीक्षार्थींवर आणि या केंद्रावर अथवा तेथील एका कक्षात पाचहून अधिक परीक्षार्थी कॉपी करताना सापडले असल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याचे शिक्षण मंडळाचे कोल्हापूर विभागीय सहसचिव टी. एल. मोळे यांनी सांगितले.