इचलकरंजी : येथील आयजीएम रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागातील ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या हाईफ्लो मशीनला मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता आग लागली. धूर येऊ लागल्याने लगेचच घटना लक्षात आली. त्यावेळी उपस्थित डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय व सुरक्षारक्षकाने प्रसंगावधान दाखवत विद्युतचे बटण बंद केले तसेच अग्निरोधक बंबाचा फवारा मारून आग आटोक्यात आणली. त्यामुळे अनर्थ टळला. आग लागल्याची माहिती मिळताच दोन अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले होते. घटनेमुळे काहीकाळ धावपळ उडाली.
मशीनमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात आली. यामध्ये सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आयजीएम रुग्णालयामध्ये वरील मजल्यावर अतिदक्षता विभागात एकूण दहा व्हेंटिलेटर बेड आहेत. त्यासोबत ऑक्सिजन पुरवठा करणारी हायफ्लो मशीन आहे. अत्यावश्यक रुणांना या मशीनमार्फत ऑक्सिजन पुरवठा केला जातो. दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यातील एक मशीन तापून-तापून त्यातून धूर येऊ लागला. बघता-बघता मशीनने पेट घेतला. धूर येऊन अतिदक्षता विभागात पसरल्याने अग्निशामक विभागास बोलावण्यात आले. तोपर्यंत तेथे काम करत असलेल्या नर्स, डॉक्टर, सुरक्षारक्षक व कर्मचाऱ्यांनी तत्काळ हालचाली करत मुख्य बटण बंद केले तसेच तेथे अडकवलेला बंब फोडून पावडर फवारणी करून ती आग विझवली. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली नाही व मोठी दुर्घटना टळली. या घटनेमुळे काहीवेळ भीतीचे वातावरण पसरून धावपळ उडाली होती. ज्यांचे रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत, त्यांच्या नातेवाइकांची घालमेल उडाली होती. आयजीएम रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक रवीकुमार शेट्ये यांच्यासह अन्य डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी धावपळ करत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले तसेच अन्य रुग्णांना दिलासा देत वातावरण पूर्ववत केले. त्यामुळे सर्वच रुग्ण व नातेवाइकांचा जीव भांड्यात पडला. रुग्णालयात सुमारे २५० रुग्ण दाखल आहेत. आगीची घटना घडल्याचे सर्वत्र पसरताच दूरध्वनीवरून नातेवाइकांकडून चौकशी सुरू झाली, तर काही नातेवाइकांनी रुग्णालय परिसरात गर्दी केली होती.
विभागात होते दहा रुग्ण
आग लागलेल्या अतिदक्षता विभागात दहा रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यातील एका रुग्णाच्या बेडजवळील मशीन जळाले. त्यामुळे उपस्थित डॉक्टर व नर्स यांनी त्या रुग्णाला जम्बो सिलिंडरच्या मदतीने ऑक्सिजन जोडून अन्यत्र हलविले. त्यानंतर तत्काळ हालचाली करून आग विझविली. त्यामुळे सर्वच रुग्ण सुखरूप राहिले.
पथकाकडून पाहणी
इलेक्ट्रिकल तपासणी करणाऱ्या पथकाने तसेच नगरपालिकेच्या आपत्कालीन विभागाच्या पथकाने रुग्णालयास भेट देऊन घटनेची पाहणी केली. त्यामध्ये रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील वायरिंग व प्लग सुरक्षित असून, मशीनमध्ये शॉर्टसर्किट झाली असण्याची शक्यता वर्तविली. त्यामुळे अन्य रुग्णांना सुरळीतपणे ऑक्सिजन पुरवठा सुरू आहे.
फोटो ओळी
११०५२०२१-आयसीएच-१०
११०५२०२१-आयसीएच-११
आयजीएम रुग्णालयात शॉर्टसर्किटने आग लागून जळालेले हायफ्लो मशीन.
११०५२०२१-आयसीएच-१२
आयजीएम रुग्णालयात आग लागल्याचे समजताच अग्निशामक बंब दाखल झाले होते.
सर्व छाया-उत्तम पाटील